४० हजार शालेय पाठ्यपुस्तके वाटेवरच; सॉफ्ट कॉपी पोर्टलवर
By किशोर कुबल | Published: June 12, 2023 09:29 AM2023-06-12T09:29:23+5:302023-06-12T09:29:48+5:30
दोन दिवसांत उपलब्धतेचा एससीईआरटीचा दावा
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर पणजी : प्राथमिक स्तरावर इयत्ता चौथीपर्यंत जवळपास सर्व शाळांना पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असली तरी पाचवी ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची टंचाई मात्र कायम आहे. तब्बल ४० हजार पाठ्यपुस्तके वाटेवर आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये एससीईआरटीच्या दीक्षा पोर्टलवर पाठ्यपुस्तकांची सॉफ्ट कॉपी अपलोड केली आहे.
कोल्हापूरच्या प्रिंटरकडे पाठ्यपुस्तके अडकली आहेत. मधल्या काळात ट्रान्स्पोर्टरच्या ट्रकला अपघात झाल्याने वितरण रखडल्याचे सांगण्यात येते. परंतु शाळा सुरू झाल्या तरी पुस्तके उपलब्ध न होणे ही दर वर्षाचीच बाब बनली आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत आठवीपर्यंत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जातात. मे महिनाअखेरपर्यंत ती मिळणे अपेक्षित होते. परंतु अनेक शाळांना अजून ती मिळालेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सात दिवस उलटले. मोफत दिली जात असल्याने ही पाठ्यपुस्तके बुक स्टॉल्समध्ये विकली जात नाहीत.
२ लाख पाठ्यपुस्तकांची गरज
पहिली ते आठवीपर्यंत दोन लाख पाठ्य पुस्तकांची गरज भासते. गेल्यावर्षीही पाठ्य पुस्तकांना विलंब झाल्याने एससीईआरटीला सॉफ्ट कॉपी पोर्टलवर टाकाव्या लागल्या होत्या. दुसरीकडे अशी माहिती मिळते की, बाजारात कागदाचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रिंटरला वेळेत पुस्तकांचा पुरवठा करणे शक्य झालेले नाही.
विद्यार्थ्यांसमोर अडचणी
काही चिंतातुर पालकांनी बुक स्टॉल गाठले. परंतु ही पाठ्यपुस्तके बुक स्टॉल्सवरही उपलब्ध नाहीत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे पुस्तके नसल्याने अडचण येत आहे. शिक्षक देत असलेल्या नोट्सवरच विद्यार्थ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
जुन्या पाठ्यपुस्तकांचा आधार
काही शाळांनी विद्याथ्र्यांना जुनी पाठ्यपुस्तके घेऊन या, असे आवाहन केले. त्यानुसार पालकांनी आपल्या पाल्यांची जुनी पाठ्यपुस्तके शाळांकडे जमा केली. वरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून आलेली जुनी पाठ्यपुस्तके तात्पुरती व्यवस्था म्हणून गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आली.
येत्या दोन दिवसांत ४० हजार पाठ्यपुस्तके आम्हाला मिळतील. रोज दोन ट्रक लोड येत आहेत. ज्या शाळांनी पाठ्यपुस्तके नेलेली नाहीत, त्यांनी संबंधित केंद्रांवरून ती न्यावीत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही दीक्षा पोर्टलवर पाठ्य पुस्तकांची सॉफ्ट कॉपी अपलोड केली आहे. - शंभू घाडी, संचालक, राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळ.