स्मार्ट सिटीचे ८४९ कोटींचे ४२ प्रकल्प पूर्ण: सदानंद शेट तानावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:08 IST2025-03-11T08:07:36+5:302025-03-11T08:08:27+5:30
राज्यसभेत मिळाली माहिती : २०२ कोटी खर्चाच्या ९ प्रकल्पांचे काम सुरू

स्मार्ट सिटीचे ८४९ कोटींचे ४२ प्रकल्प पूर्ण: सदानंद शेट तानावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. ने १,०५१ कोटी रुपये खर्चाचे ५१ प्रकल्प हाती घेतले. त्यापैकी ८४९ कोटींचे ४२ प्रकल्प पूर्ण झाले. २०२ कोटी रुपये खर्चाच्या ९ प्रकल्पांचे काम सध्या चालू आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून स्मार्ट सिटी मिशनची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती राज्यसभेत खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व नगर व्यवहार राज्यमंत्री टोखन साहू यांनी दिलेल्या लेखी उत्तरात पुढे असेही म्हटले की, 'पणजी स्मार्ट सिटीने केंद्राकडे ४४१ कोटी रुपयांचा दावा केला. त्यापैकी ४११ कोटी रुपये प्रत्यक्षात वापरले. प्रत्येक कामाच्या बाबतीत राज्य सरकारच्या तांत्रिकी व वित्तीय नियमांचे पालन केलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाची तक्रार केंद्राकडे आलेली नाही.
उत्तरात असे म्हटले की, कामांसाठी काही खात्यांचे परवाने मिळवण्यास वेळ लागला. भूसंपादनाच्या बाबतीतही अडचणी आल्या. काम करताना भूमिगत जलसाठ्याबाबत समस्या निर्माण झाली. शिवाय पावसात काम होऊ शकले नाही. त्यामुळे कामांना विलंब झाला. पुढे असेही नमूद केले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांमुळे धूळ प्रदूषण, वाहतुकीची कोंडी वगैरे प्रकार घडले. त्यावर उपाययोजनाही करण्यात आल्या. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काम चालू असलेल्या ठिकाणी नियमितपणे पाण्याची फवारणी करण्यात आली. बांधकामाचे साहित्य योग्य प्रकारे झाकून ठेवण्यात आले. काम चालू असलेल्या ठिकाणी दिव्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली.
...अशी आहेत कामे ?
स्मार्ट सिटीअंतर्गत केलेली कामे केवळ रस्ते व मलनिस्सारण कामांचेच नव्हे, तर भूमिगत वीज वाहिन्या, वायरलेस नेटवर्क, इंटरनेट बॅण्डविथ कनेक्टिव्हिटी, घनकचरा व्यवस्थापन, बायोडायजेस्टर, लॅण्डस्केपिंग, अंतर्गत बस वाहतूक व्यवस्था, स्मार्ट पार्किंग, रायबंदर येथे मार्केट प्रकल्प आदी कामांचाही समावेश आहे.