सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 07:25 AM2024-10-25T07:25:18+5:302024-10-25T07:26:31+5:30
गेल्या आठवड्यात चाळीस हजारांचा टप्पा भाजप सदस्य नोंदणी मोहीमेने सत्तरीत गाठला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : भाजप सदस्य नोंदणीची नवी यादी काल, गुरुवारी जाहीर झाली. सत्तरी तालुका भाजपमय झाला आहे. तिथे एकूण ४४ हजार सदस्यांची नोंद काल पूर्ण झाली. पूर्ण गोव्यात वाळपई मतदारसंघ हा सदस्य नोंदणीबाबत पहिला ठरला आहे. तिथे एकूण २३ हजार ३४७ सदस्य नोंद झाले आहेत.
पर्ये व वाळपई हे दोन मतदारसंघ सत्तरी तालुक्यात येतात. गेल्या आठवड्यात चाळीस हजारांचा टप्पा भाजप सदस्य नोंदणी मोहीमेने सत्तरीत गाठला होता. आता ४३ हजार ९२९ म्हणजेच ४४ हजार सदस्य झाले आहेत. पर्ये मतदारसंघात २० हजार ५८२ सदस्य नोंदविले गेले आहेत. मंत्री विश्वजित राणे आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काल या यशाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, तिसवाडीत आता भाजप सदस्य नोंदणीची मोहमी गती घेऊ लागली आहे. पणजीत सदस्य वाढले व १४ हजार ५६ झाले. डिचोली तालुक्यात सदस्य वाढले आहेत. डिचोली मतदारसंघात ९,८३९ सदस्यांची तर साखळी मतदारसंघात १७,२६७ भाजप सदस्यांची नोंद झाली आहे. तर साखळी मतदारसंघात १७ हजार २६७ सदस्यांची नोंद झाली आहे.
उत्तर गोव्यातील सांताक्रुझ, सांत आंद्रे तर दक्षिण गोव्यात नुवे किंवा कुंकळ्ळी, वेळ्ळी अशा काही विधानसभा मतदारसंघात भाजपची सदस्यसंख्या वाढत नाही. ख्रिस्ती बांधव जास्त संख्येने मतदार होण्यासाठी पुढे येत नाहीत असे दिसले होते. भाजपचे काही हिंदू आमदारदेखील सदस्य नोंदणी वाढविण्यासाठीच्या कामात कमी पडत आहेत, असे चित्र दिसून आले होते. मात्र याचबरोबर सत्तरी तालुक्यासारखे काम अन्य काही तालुक्यांमध्ये झाले नाही याची कल्पना भाजपला आली आहे.
बार्देश तालुक्यात अल्प प्रतिसाद
दरम्यान, बार्देश तालुक्यात म्हापसा, पर्वरी, कळंगुट, शिवोली, हळदोणा व थिवी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. तिथे भाजपची सदस्य संख्या एकूण ३८ हजार ८४७ पर्यंत मर्यादित राहिली आहे. म्हापसा मतदारसंघात ६,८२७ एवढे तर साळगावमध्ये ७,७५८ सदस्य नोंद झाले आहेत. कळंगुट व शिवोलीत भाजपचा अपेक्षाभंगच झाला आहे. पर्वरीत ७,७५२ तर हळदोणे मतदारसंघात ४,४९४ सदस्यांची नोंद झाली आहे.