दाबोळी विमानतळावर ४५ दिवस निर्बंध!
By admin | Published: March 14, 2015 12:42 AM2015-03-14T00:42:59+5:302015-03-14T00:48:40+5:30
पणजी : दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीची सुधारणा करण्यात येणार असल्याने दुरुस्तीकामासाठी १५ एप्रिलपासून ४५ दिवस निर्बंध येणार आहेत,
पणजी : दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीची सुधारणा करण्यात येणार असल्याने दुरुस्तीकामासाठी १५ एप्रिलपासून ४५ दिवस निर्बंध येणार आहेत, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देशी एअरलाइन्सची विमाने त्यामुळे वेळापत्रक बदलून विमानांच्या फेऱ्या कमी करू शकतात. सध्या रोज १0४ विमाने दाबोळीवरून उड्डाण करतात.
धावपट्टीचे मध्य भागातील मुख्य काम १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. ते ३१ मे पर्यंत सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या कालावधीत विमानतळ केवळ पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेतच खुला राहील. नौदलाचा हा विमानतळ सध्या सकाळी ८.३0 ते दुपारी १ या वेळेत नागरी विमानांसाठी बंद असतो.
दरम्यान, फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्स या महासंघाने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलावे, अशी मागणी केली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी ११ ऐवजी दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजेच दोन तासांनी मुदत वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाचा विचार आहे; परंतु याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)