४८ सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 01:39 AM2017-05-11T01:39:37+5:302017-05-11T01:43:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : दहाहून कमी विद्यार्थी ज्या सरकारी प्राथमिक शाळेत शिल्लक राहतात अशा प्राथमिक शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : दहाहून कमी विद्यार्थी ज्या सरकारी प्राथमिक शाळेत शिल्लक राहतात अशा प्राथमिक शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून बाजूच्या शाळेत विलीन केल्या जाणार आहेत. तशा सूचना तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण खात्याने केलेल्या आहेत. म्हणजेच त्या शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळेत एकही नवा विद्यार्थी भरती होत नाही, अशी शाळा तर येत्या शैक्षणिक वर्षी सुरूच राहू शकणार नाही. साधारणत: ४८ शाळा नव्या शैक्षणिक वर्षी बंद होतील, असे शिक्षण खात्याने गृहीत धरले आहे.
प्रत्येक तालुक्यातील सरकारी चार शाळा बाजूच्या शाळेत विलीन कराव्या लागतील, असे खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटते. गेल्या शैक्षणिक वर्र्षीही काही तालुक्यांमध्ये सरासरी दोन-तीन प्राथमिक शाळा बाजूच्या शाळेत विलीन कराव्या लागल्या. सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. दहापेक्षा कमी विद्यार्थी ज्या शाळेत आहेत अशा शाळांबाबतची माहिती सादर करण्यास शिक्षण खात्याने तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे. एक शाळा दुसऱ्या शाळेत विलीन करण्याचा प्रयत्न करून पाहा, असे खात्याने भागशिक्षणाधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. काही भागशिक्षणाधिकारी असा प्रयत्न करून पाहत नाहीत; कारण चार विद्यार्थी जरी शिल्लक असले, तरी आपल्या वाड्यावरील सरकारी शाळा चालावी, असे ग्रामस्थांना वाटते. मराठी-कोकणीतील अनुदानित शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची योजना सरकारने मार्गी लावल्यामुळे सरकारी शाळांच्या घसरगुंडीला वेग येऊ शकतो, असे काही पालकांना वाटते. येत्या दि. १९ तारीखपर्यंत शिक्षण खात्याकडे शाळांमधील विद्यार्थ्यांबाबतची आकडेवारी येणार आहे व त्यामुळे किती शिक्षक अतिरिक्त ठरतात हेही खात्याला कळून येईल. अनेक शाळा बंद पडल्यानंतर किंवा त्यांचे विलिनीकरण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्याही वाढणार आहे.
शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शाळा विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे. बारा तालुक्यांमधील प्रत्येकी चार शाळा विलीन झाल्या, तर ४८ शाळांचे विलिनीकरण झाल्यासारखे होईल. मात्र, अजून निश्चित आकडेवारी प्राप्त झालेली नाही.