चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:41 PM2020-01-10T12:41:53+5:302020-01-10T12:44:43+5:30
म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे.
पणजी - म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे. विष घालून वाघांना मारले गेले. वन खाते वाघांचा मृत्यू रोखू शकले नाही व त्यामुळे वन खात्यावर प्रथमच सर्वबाजूंनी टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. वन खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सांभाळत असून स्वत: सावंत हे देखील वाघ हत्येमुळे व्यथित झाले आहेत.
तिघा बछड्यांसह चार वाघांची हत्या झाली ही घटना मन सून्न करणारी आहे. खरोखर मलाही फार वाईट वाटले, असे मुख्यमंत्री सावंत यांनी लोकमतला सांगितले. एका धनगर कुटूंबातील गाय व म्हस वाघांनी मारली होती. त्यामुळे त्या कुटूंबातील काहीजणांनी विष घातले व वाघांचा जीव घेतला. आठ वर्षाची वाघिण आणि तिचे एक ते दीड वर्षाचे बछडे विषबाधेने मेले. त्यापैकी दोघा बछडय़ांना आरोपींकडून पुरले गेल्याचेही उघड झाले. अजून या प्रकरणाचा पूर्ण छडा लागलेला नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने चौकशी पथक स्थापन केले आहे. वाघ मेल्यानंतर आपण वाघांना पुरले पण विष घालून त्यांना मारल्याचे काम आपण केलेले नाही अशी भूमिका एका आरोपीने घेतली आहे. या प्रकरणी गुंता वाढला आहे. त्यामुळे वन खात्याने आपल्या आणखी पाच अधिकाऱ्यांना चौकशीच्या कामासाठी नेमले आहे.
धनगर कुटूंबियांच्या दुभत्या जनावरांवर वाघ हल्ले करत होते तेव्हा वन खाते निष्क्रीय राहिले. खात्याने उपाययोजना करायला हवी होती. वाघांचा शिरकाव लोकवस्तीकडे होऊ नये म्हणूनही वन खात्याने उपाययोजना केली नाही, असे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर तसेच मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षानेही अशाच प्रकारची टीका केली. म्हादई अभयारण्यातील वाघ हत्येची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तसेच माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, उपसभापती इजिदोर फर्नाडिस आदींनी केली. अभयारण्य परिसरातील लोकांना जर इच्छा असेल तर त्या लोकांचे सरकार अन्यत्र पुनर्वसन करील, असे मुख्यमंत्री म्हणाले.