मोपा विमानतळावर ५.७ किलो सोने जप्त; तिघा तस्करांकडून २८ आयफोन मोबाइलही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 08:13 AM2023-10-23T08:13:06+5:302023-10-23T08:13:25+5:30
या विमानतळावरील ही आतापर्यंतची मोठी कारवाई असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मोपा विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) छापा टाकून ३.९२ कोटींचे सोने आणि २८ मोबाइल जप्त केले आहेत. या विमानतळावरील ही आतापर्यंतची मोठी कारवाई असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
मोपा विमानतळावर उतरणाऱ्या अबुधाबीहून आलेल्या तिघांवर डीआरआयने पाळत ठेवली होती. कारण त्यांच्याविषयी बरीच माहिती डीआरआयला मिळाली होती. शनिवार, दि. २१ रोजी विमानतळावर तिघे संशयित पोहोचले असता त्यांना अटक करण्यात आली. गुजरात येथील बाला पटेल उर्फ मोहम्मद इरफान गुलाम नबी (३७), उत्तर प्रदेश येथील इरफान (३०) व मुंबई येथील कामरान अहमद खान (३८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या संशयितांकडून ५.७ किलो सोने व २८ आयफोन १५ चे हँडसेट जप्त - करण्यात आले. यापूर्वी दाबोळी विमानतळावरून अशी मोठी तस्करी अनेकवेळा पकडण्यात आली होती. परंतु मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
राज्यात तीन वर्षात ३० किलो सोने जप्त
दरम्यान, यापूर्वी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अधूनमधून तस्करीचे सोने पकडले जाण्याच्या घटना घडत होत्या. प्राप्त माहितीनुसार गेल्या तीन वर्षांच्या काळात गोव्यात सोन्याच्या तस्करीचे ३६ गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून ३० किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. २०२१ साली गोव्यात सोने तस्करीची १३ प्रकरणे घडली व १२.२२ किलो सोने जप्त करण्यात आले. २०२२ साली १५ प्रकरणे घडली व ८.९ किलो सोने जप्त केले. २०२० साली ७ प्रकरणे घडली व ७.७४ किलो सोने जप्त केले.