पूनमचा पॉर्न व्हिडीओ भोवला; काणकोण पोलीस निरीक्षकासह 5 निलंबित, पूनम-सॅमविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 01:00 PM2020-11-05T13:00:59+5:302020-11-05T13:03:28+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघेच तेथे उपस्थित होते.
मडगाव : काणकोणच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलिसांना चांगलाच भोवला आहे. हा व्हिडीओ शूट होताना पुनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
काणकोण पोलीस स्थानकावर पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघेच तेथे उपस्थित होते. पुनमचा हा व्हिडीओ सॅमने शूट केला होता. हा व्हिडीओ शूट करताना त्या ठिकाणी दोन साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले असून, या धरणावर पहाऱ्यासाठी त्या दिवशी उपस्थित असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी करून काणकोणच्या नागरिकांनी गुरुवारी बंदची हाक दिली होती. संबंधितांना निलंबित केल्याने हा बंद नंतर मागे घेण्यात आला.