रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढा अन् 1 हजार मिळवा; पालिकेची नवी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 04:31 PM2019-07-06T16:31:01+5:302019-07-06T16:35:28+5:30

महापालिकेची कचरा सेन्टीनल मोहीम वादाच्या भोवऱ्यात

5 thousand penalty for throwing street on garbage margao municipal corporations campaign creates controversy | रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढा अन् 1 हजार मिळवा; पालिकेची नवी मोहीम

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढा अन् 1 हजार मिळवा; पालिकेची नवी मोहीम

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी मडगाव पालिकेने मोठा गाजावाजा करुन कचरा सेन्टीनल ही मोहीम सुरु केली होती. तरी या मोहिमेला कायदेशीर वैधता आहे का या प्रश्नावरुन ही मोहीम वादात सापडली आहे. मडगाव पालिकेच्या या मोहिमेप्रमाणे कुणीही रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे फोटो पालिकेच्या व्हॉटस् पवर पाठविले तर त्या कचरा टाकणाऱ्याला 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे आणि ज्या कुणी फोटो किंवा व्हिडिओद्वारे ही माहिती पालिकेपर्यंत पोहोचविली त्याला त्या दंडाच्या रकमेतील एक हजार रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

मडगाव पालिकेने ही मोहीम जरी सुरु केली असली, तरी अद्याप या योजनेला पालिका प्रशासन संचालकाकडून मान्यता मिळालेली नाही. एवढेच नव्हे तर या मोहिमेबद्दल मडगाव पालिकेने पालिका संचालकाशी चर्चाही केली नाही, अशी माहिती आता पुढे आली आहे. एवढेच नव्हे, तर ही मोहिम राबविताना स्थानिक नगरसेवकांनाही विश्वासात घेण्यात आले नव्हते. ही मोहिम मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी एकट्यानेच राबवली आहे अशी टीका मडगावचे नगरसेवक राजू शिरोडकर यांनी केली आहे.

कायद्याच्या कसोटीवरही ही योजना तगू शकेल का हाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कुणीही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केल्यास त्याला दंड करण्याचा अधिकार पालिकेस नाही. पालिका कायद्याप्रमाणो कुणीही सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास पालिका त्याला पहिल्यावेळी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत दंड आकारु शकते. दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास पालिकेला तो वाढविता येतो. मात्र रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना पालिका 5 हजाराचा दंड कोणत्या कायद्याखाली ठोठावणार हा प्रश्र्न निर्माण झाला आहे.

ही योजना सुरु करुन 28 तासही उलटले नसताना या योजनेचा दुरुपयोगही सुरु झाला आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका व्यापा:याला स्थानिकांनी अडविल्यानंतर हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यत पोहोचले आहे. अशातच मडगाव पालिकेची कचरा उचलण्याची मोहीम अजुनही सुरळीत झालेली नाही. कित्येक ठिकाणचा कचरा मडगाव पालिकेने व्यवस्थितरित्या उचललेला नाही. अशा परिस्थितीत कचरा रस्त्यावर फेकण्याशिवाय आमच्यासमोर आणखी पर्याय उरलेले नाहीत ,अशा प्रतिक्रिया कित्येक नागरिकांनी व्यक्त केल्या असून ही एकंदर स्थिती पाहता मडगाव पालिकेने कचरा उचलण्याच्या मोहिमेबद्दल अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घरपट्टीची पावती दाखविल्याशिवाय कचरा उचलला जाणार नाही असा आणखी एक फतवा मडगाव पालिकेने शुक्रवारी जारी केला असून त्यामुळेही मडगाव पालिका पुन्हा वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्यामते   मडगावात अजूनही हजारो घरांना घरपट्टीखाली आणलेले नाही त्यात सरकारी क्वॉटर्स व स्वत: नगरपालिकेचीही काही आस्थापने आहेत. शहरात ही वस्तुस्थिती असताना पालिकेने हा आदेश जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव पालिका या हजारो घरांतील कचरा न उचलता तसाच ठेवणार का असा सवाल कुतिन्हो यांनी केला आहे. आतापर्यंत मडगाव पालिका प्रामाणीक कर भरणाऱ्यांना पिळत आली आहे. हा नवीन फतवा त्याचीच पुढची पायरी का असा सवाल त्यांनी केला आहे.
 

Web Title: 5 thousand penalty for throwing street on garbage margao municipal corporations campaign creates controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा