कदंबच्या ५० बसेस भंगारात; १५ वर्ष जुन्या वाहनांचा 'निकाल', महामंडळाला बसेसची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 03:54 PM2024-06-12T15:54:50+5:302024-06-12T15:55:35+5:30
राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत
नारायण गावस, पणजी: केंद्र सरकारच्या १५ वर्ष जुनी वाहने भंगारात काढण्याच्या नवीन कायद्याचा कदंब महामंडळाला बराच फटका बसला आहे. कदंब महामंडळाने एकूण ५० जुन्या १५ वर्षापर्यंतच्या बसेस भंगारात काढल्या. तसेच काही बसेस बंद आहेत. त्यामुळे सध्या महामंडळाकडे बसेसची कमतरता भासत आहे. यासाठी राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले
तुयेकर म्हणाले, सध्या कदंब महामंडळाच्या आंतरराज्य मार्गावरील अनेक बसेस बंद आहेत. तसेच ग्रामीण भागातही काही बसेसची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे राज्यभरातील विविध शाळांमध्ये अजूनही सुमारे ७० बसेसची आवश्यकता आहे. यासाठी महामंडळाला १०० इलेक्ट्रिक बसेस हैदराबादच्या एका कंपनीकडून येणार आहे. यांतील फक्त त्यांनी ४ बसेस आल्या आहेत. आणखी ९६ बसेस दिल्या जाणार आहेत. या बसेस आम्ही शाळा तसेच ग्रामीण भागात घालणार आहोत. तसेच सरकार ५० डिझेलच्या बसेस देणार त्या आंतरराज्य मार्गावर घातल्या जाणार आहेत.
तुयेकर पुढे म्हणाले, राज्यात स्मार्ट सिटी पणजीसाठी मिनी कंदब इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. पण अजून पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झालेली नाही त्याचप्रमाणे शहरातील अन्य खासगी बसेस आहे त्या मालकांशी चर्चा करुन व याेग्य ताेडगा काढून या बसेस सुरु केल्या जाणार आहेत. या लोकांच्या पोटावर आड येणार नाही असेही तुयेकर यांनी सांगितले.