सावर्डेत पूल कोसळून ५0 बुडाले
By admin | Published: May 19, 2017 02:47 AM2017-05-19T02:47:25+5:302017-05-19T02:54:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : सावर्डे येथील जुवारी नदीपात्रातील वापरात नसलेला जुना व मोडकळीस आलेला पदपूल कोसळून सुमारे ५0 ते ७0 लोक बुडाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : सावर्डे येथील जुवारी नदीपात्रातील वापरात नसलेला जुना व मोडकळीस आलेला पदपूल कोसळून सुमारे ५0 ते ७0 लोक बुडाले. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यातील २५ जणांना वाचविण्यात यश आले. रात्रभर बचावकार्य युद्धपातळीवर चालू होते. एकाचा मृतदेह हाती लागला असून अनेकांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे.
या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या एकाच्या मृतदेहाचा शोध पोलीस होडीच्या साहाय्याने घेत होते. ते पाहण्यासाठी बघ्यांची तोबा गर्दी तेथील जुन्या पुलावर झाली आणि त्यांच्या वजनाच्या भारामुळे पूल कोसळला. सुमारे १५ जणांनी पोहत किनारा गाठला, तर सहा जणांना लोकांच्या साहाय्याने बुडताना वाचविण्यात आले. कोसळलेल्या पुलाच्या कठड्यांना लटकलेल्या दहा ते बारा जणांना बाहेर काढण्यात आले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह मिळाला. सुमारे १५ ते २0 लोक बेपत्ता असून क्रेन तसेच नौदलाच्या होड्यांच्या साहाय्याने त्यांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे मृतांची नेमकी संख्या समजू शकली नाही. बचावकार्यात अग्निशामक दल, पोलीस, स्थानिक तसेच नौदलाचे जवानही मदत करत आहेत.
कुडचडे पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जुवारी नदीच्या पात्रात वाहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या साहाय्याने कुडचडे ते सावर्डेला जोडणाऱ्या पुलाखालून मृतदेह काढण्यास प्रारंभ केला. ते पाहण्यासाठी नवीन पुलाच्या शेजारी असलेल्या सुमारे ४0 वर्षे जुन्या व सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असलेल्या पदपुलावर शेकडो लोक उभे होते. अचानक पुलाचा एक भाग कोसळला व सुमारे ५0 ते ७0 लोक नदीपात्रात पडले. अनेकांना पुलाच्या लोखंडी भागांना आपटून जबर मार बसला. त्याही स्थितीत काहींनी पोहत किनारा गाठला. बचावकार्य करताना पडलेला पूल के्रनद्वारे वर खेचला असता, खाली दबलेला एक मृतदेह मिळाला. त्याच्या खिशात पोलिसांना बसवराज मरेनवार या सांगे गावातील युवकाचे पाकीट सापडून आले. तो मृतदेह मरेनवार याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले आहेत.
प्रारंभी कितीजण बुडून बेपत्ता झाले, याबाबत काहीही अंदाज नव्हता. तसेच नदीपात्रात खोलवर जाऊन शोधणारी व्यक्तीही नसल्यामुळे पोलीस व अग्निशामक दल हतबल बनले होते. अग्निशामक दलाची विद्युत सामग्री आणून शोधकार्य हाती घेण्यात आले. दांडो-सांगे गावातील फ्रान्सिस फर्नांडिस या पट्टीच्या पोहणाऱ्याला बोलावून आणण्यात आले. त्याने नदीत खोलवर जाऊन बुडालेल्यांचा शोध घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय नौदलाला मदतीचे आवाहन केले. खासदार नरेंद्र सावईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार रात्री १0 वाजता नौदलाचे ‘डायव्हर्स’ जवान दाखल झाले.
सार्वजनिक बांधकाममंत्री
सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते
बाबू कवळेकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी घटनास्थळी भेट
देउन बचावकार्याचा आढावा घेतला
व उपयुक्त सूचना केल्या.