मृतांच्या कुटुंबीयांना ५०-५० लाख रुपये; मेघनाकडून २ कोटी जमा, जखमींना भरपाईचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:20 AM2023-09-07T09:20:42+5:302023-09-07T09:21:59+5:30

यादरम्यानच्या सुनावणीत न्यायालयाने तिला अपघातग्रस्तांसाठी दोन कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.

50 lakh each to the families of the deceased 2 crore deposit from meghna savardekar distribution of compensation to the injured | मृतांच्या कुटुंबीयांना ५०-५० लाख रुपये; मेघनाकडून २ कोटी जमा, जखमींना भरपाईचे वाटप

मृतांच्या कुटुंबीयांना ५०-५० लाख रुपये; मेघनाकडून २ कोटी जमा, जखमींना भरपाईचे वाटप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बाणस्तारी येथे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या मर्सिडिस अपघातात मृत पावलेले सुरेश आणि भावना फडते हे दाम्पत्य तसेच अरुप कर्माकर यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

अपघातात जखमी झालेले शंकर हळर्णकर यांना ४० लाख, वनिता भंडारींना ३५ लाख व राज माजगावकर यांना २५ लाख रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बाणस्तारी येथे झालेल्या अपघातावेळी मद्यधुंद चालक परेश सिनाय - सावर्डेकर याच्या मर्सिडिसने धडक दिल्याने तिघे जण ठार, तर सहा जण जखमी झाले होते. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तर मेघना सिनाय सावर्डेकर हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

यादरम्यानच्या सुनावणीत न्यायालयाने तिला अपघातग्रस्तांसाठी दोन कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. नशेत भरधाव मर्सिडिस कार चालवून परेश याने बाणस्तारी पुलावर हा भीषण अपघात केला होता. या अपघाताला बुधवारी एक महिना पूर्ण झाला. जामिनावरील अर्जाच्या सुनावणीवेळी अपघातग्रस्तांसाठी दोन कोटी रुपये देण्याची हमी मर्सिडिस कारची मालक मेघना हिने उच्च न्यायालयात दिले होते. त्याची कार्यवाही करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी क्राइम ब्रँचने लमाणी आणि पालेकर या दोघांनाही अटक केली होती. पुराव्यांशी फेरफार करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता, तसेच पुरावे जप्त करण्यासाठी अटक करण्यात आल्याचे म्हटले होते; परंतु सत्र न्यायालयाने त्यांना दोघांना जामीन मंजूर करताना पुरावे जप्त करण्यासाठी अटकेची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यांना दोघांनाही आपले मोबाइल क्राइम ब्रँचकडे सोपविण्यास सांगितले होते. त्याची अंमलबजावणी आता करण्यात आली आहे.

... तर सहा महिन्यांत दावा निकाली काढा

मेघना हिने मंगळवारी २ कोटी रुपये न्यायालयात जमा केल्यानंतर बुधवारी सुनावणीवेळी न्यायालयाने त्याची पीडितांसाठी विभागणी केली. पीडितांना ही रक्कम मिळाली असली, तरी मोटार वाहन अपघात लवादाकडे जाण्यास पीडित मोकळे आहेत. तसेच त्यांचा नुकसान भरपाईसंदर्भात खटला आल्यास तो सहा महिन्यांच्या आत निकालात काढण्यात यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला.

मोबाइल जप्त

बाणस्तरी येथील भीषण अपघात झाल्यानंतर तोतया ड्रायव्हर बनून पुढे आलेला गणेश लमाणी आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अॅड. अमित पालेकर या दोघांचेही मोबाइल क्राइम ब्रँचकडून जप्त करण्यात आले आहेत. बाणस्तारी पुलावर ६ ऑगस्ट रोजी मेघना सिनाय सावर्डेकर यांच्या मालकीच्या मर्सिडिझ कारने सहा वाहनांना ठोकरून मृत्यूचे तांडव घडवून आणले. त्यानंतर तेथील संतप्त जमाव जेव्हा चालकाच्या शोधात होता, तेव्हा गणेश लमाणी याने म्हार्दोळ पोलिस स्थानकात जाऊन आपण गाडी चालवीत असल्याचे सांगितले होते. पोलिसांचे दंडुके खाल्ल्यानंतर त्याने आपण तोतया असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी क्राइम बँचला दिलेल्या जबानीनुसार अॅड. अमित पालेकर याने त्याला तोतया ड्रायव्हर बनवून पाठविल्याचे सांगितले होते, तसेच हे काम आपण पैशांसाठी केले, अशी कबुली दिली होती.


 

Web Title: 50 lakh each to the families of the deceased 2 crore deposit from meghna savardekar distribution of compensation to the injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.