मनपात ५० लाखांचा सोपो घोटाळा: उदय मडकईकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:44 AM2023-05-15T08:44:57+5:302023-05-15T08:46:27+5:30
विक्रेत्यांकडून पैसे घेऊन पावती नाही; दोन वर्षांपासून प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पणजी महापालिकेत ५० लाखांचा सोपा घोटाळा झाल्याचा आरोप माजी महापौर उदय मडकईकर यांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून मनपा कर्मचारी पणजी बाजारात बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांकडून सोपो घेते. मात्र त्या बदलत्या त्यांना पावती दिल्या जात नसल्याचे मडकईकर यांनी म्हटले आहे.
सोपोची पावती मागितली तर आपल्याला बाजारातून हटवले जाईल या भीतीनेच पणजी बाजारात बसणारे विक्रेते निमुटपणे हा सोपो देत आहेत. पावती का देत नाहीत? असा जाब जेव्हा मडकईकर यांनी सदर कर्मचाऱ्याला विचारला तेव्हा त्यांनी त्यावर उडवाउडवीची उत्तर दिली.
मडकईकर म्हणाले, की आपण सकाळी पणजी बाजारात जेव्हा मासळी आणण्यासाठी गेलो तेव्हा हा धक्कादायक प्रकार दिसून आला. सकाळी ६ ते ९ असे तीन तास भाजी, फळ तसेच मासळी विक्रेते बाजारात साहित्य विक्रीसाठी येतात. या विक्रेत्यांकडून पणजी मनपा सोपा गोळा करते. प्रति विक्रेत्याला प्रति दिन २० रुपये इतका सोपो भरायचा असतो. मनपा कर्मचारी या सोपोच्या बदल्यात विक्रेत्यांना पावती देतात. मात्र मागील दोन वर्षांपासून सोपो गोळा करुन ही विक्रेत्यांना पावती दिली जात आहे. आपल्याकडे पावती पुस्तक नसल्याचे खुद्द कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे मडकईकर म्हणाले.
आयुक्त, महापौर, आमदारांनी लक्ष द्यावे
पणजी मनपामध्ये असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. सदर बाब आपण मनपा आयुक्त क्लेन मदेरा, महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नजरेस आणून दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी. तसेच घोटाळ्याची पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही दखल घ्यावी, अशी मागणी मडकईकर यांनी केली आहे.
पोलिसांत तक्रार करा
सदर सोपो घोटाळ्याची कसून चौकशी व्हायला आहे. सोपोच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा कुठलाही हिशोब नाही. त्यामुळे पणजी मनपाने याप्रकरणी पणजी पोलिसांत त्वरित तक्रार करावी. ही बाब अत्यंत गंभीर असल्याची अशी मागणी आपण आयुक्तांकडे केल्याचे उदय मडकईकर यांनी सांगितले.
घोटाळ्याचा हिशोब
सध्या आंब्यांचा हंगाम आहे. त्यामुळे भाजी व फळ विक्रेते मोठ्या प्रमाणात आंब्याच्या विक्रीसाठी बाजारात येत आहेत. त्यामुळे दरदिवशी किमान ७ हजार रुपये सोपो गोळा केला जातो. प्रति दिन ७ हजार रुपयांप्रमाणे महिन्याचे २ लाख १० हजार तर दोन वर्षाचे ५० लाख होतात. सदर सोपो घोटाळा हा ५० लाखांचा असल्याचा आरोप माजी महापौर मडकईकर यांनी केला.