ऊस शेतकऱ्यांना ५०० रुपये वाढीव भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:20 AM2017-07-20T02:20:00+5:302017-07-20T02:22:11+5:30
पणजी : गोव्यातील ऊस उत्पादकांचा प्रत्येक टन भाव ५०० रुपयांनी वाढवून देण्याचे गोवा सरकारने मान्य केल्याने ऊस उत्पादक
पणजी : गोव्यातील ऊस उत्पादकांचा प्रत्येक टन भाव ५०० रुपयांनी वाढवून देण्याचे गोवा सरकारने मान्य केल्याने ऊस उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांचे आभार मानले.
ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जिवाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई, खजिनदार दयानंद फळदेसाई, सदस्य नागेश सामंत, सुभदा सावईकर, तसेच कुर्डी व्हीकेएएस सोसायटीचे फ्रान्सिस्क मास्कारेन्हस यांनी बुधवारी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांची भेट घेतली. ऊसाचा दर वाढवून न दिल्यास उद्यापासून राज्यात संप करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मुख्यमंत्र्यांनी ऊसाचा दर अडीच हजारांवरून तीन हजार रुपये करण्याची व हा दर गेल्या मोसमापासून लागू करण्याची घोषणा या वेळी केली. त्या निर्णयाबद्दल संघटनेने दोन्ही नेत्यांचे आभार मानले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊसाचा टनामागे दर ३४०० रुपये मिळावा, अशी शेतकऱ्यांची मूळ मागणी होती; परंतु अर्थसंकल्पात तशी तरतूद केलेली नसल्याने तीन हजार रुपयांवर आम्ही समाधानी असल्याचे ते म्हणाले. संजीवनी साखर कारखान्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक व कृषी अधिकारी नियुक्त करावा, अशाही संघटनेच्या मागण्या असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्याने ऊसाचे उत्पादन घटून ते ४६ हजार टन बनले होते. यंदा ते ५५ हजार टनांवर नेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. सांगे, काणकोण, वाळपई व केपे येथे ऊसाचे पीक घेतले जाते. त्यातही
सांगे व केपे हे तालुके आघाडीवर आहेत.