पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी पाच हजार पोलिसांची सुरक्षा; पोलिस महासंचालकांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 07:45 AM2023-10-22T07:45:54+5:302023-10-22T07:46:26+5:30
सुरक्षा जबाबदारीचेही नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यासाठी ५ हजार पोलिसांची सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी दिली आहे.
या सुरक्षेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार कंपन्यांचा समावेश आहे. पंतप्रधानाच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर राहणार नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांना कमालीची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयात आणि प्रत्यक्ष कार्यक्रम होणार असलेल्या फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्येही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका मागून बैठका होत आहेत. स्वत: डॉ. सिंग सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवून आहेत.
अशी जमवाजमव
गोवा पोलिसांचे एकूण मनुष्यबळ ८ हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे आहे. परंतु, राज्यातील सर्व पोलिस स्थानके आणि इतर आस्थापनात आवश्यक मनुष्यबळ हे ठेवावेच लागत असल्यामुळे सुरक्षेची जमवाजमव करताना मुख्यालयाची दमछाक होत आहे. होमगार्ड, आयआरबी तसेच नव्याने भरती केलेल्या व दिल्लीत प्रशिक्षण घेत असलेल्या पोलिसांना बोलावून घेतलेलेच आहे. शिवाय केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४ कंपन्याही गोव्यात दाखल झाल्या आहेत.
स्टेडियमचा रस्ता टाळावा
२६ ऑक्टोबर रोजी उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान हेलिकॉप्टरने येणार की रस्ता मार्गाने येणार हे सुरक्षा कारणामुळे ऐनवेळी जाहीर केले जाईल. तसेच, रस्ता मार्गाने आल्यास नेमके कोणत्या रस्त्याने येणार हेही तेव्हाच जाहीर केले जाते. त्यामुळे लोकांनी शक्यतो फातोर्डा स्टेडियमकडे जाणारा रस्ता त्या दिवशी टाळावा, असे आवाहन डॉ. सिंग यांनी केले आहे.
अशी आहे सुरक्षा व्यवस्था
एकंदर कार्यक्रमाचा सर्वच परिसर हा विविध क्लस्टरमध्ये विभागण्यात आला आहे. अधीक्षक रँकचा अधिकारी हा प्रत्येक क्लस्टरचा कमांडर असेल. त्यानंतर क्लस्टरमध्ये उपअधीक्षक रँकचे अधिकारी हे स्थळ सुरक्षाप्रमुख असतील. या ठिकाणी तोडफोड विरोधी पथके तैनात असतील. तसेच, लोकाच्या बँग्ज व इतर वस्तूंसाठी एक्स-रे स्कॅनिंग व्यवस्था असेल. कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी दहशतवाद विरोधी पथके सुसज्ज ठेवलेली असतील. पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग हे मुख्य सुरक्षा अधिकारी असतील.