पर्वरीतील गुंतवणूकदारांना ५.८० कोटींचा गंडा; कंपनी मालकाविरोधात तक्रार
By मयुरेश वाटवे | Published: April 4, 2023 05:36 PM2023-04-04T17:36:27+5:302023-04-04T17:37:21+5:30
त्या रकमेपोटी त्याना आपल्या कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी दिली होती.
पणजी - पर्वरी आणि इतर भागातील लोकांना एजंट म्हणून नेमून इतर लोकांकडून आपल्या सुवर्ण कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून सुमारे ५ कोटी ७९लाख ७७ हजार रुपयांना ठकवल्याबद्दल पर्वरी पोलीस स्थानकात कंपनीच्या मालकाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुकूर येथील प्रभू एन्क्लेव्हमध्ये राहणारा अक्षय अनंत सावंत (मूळ मुंबईचा रहिवासी) याच्याविरुद्ध पर्वरी येथील मोहमद शरीफ वासिम खान आणि इतर चौघांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. अक्षयने श्री व्यंकटेश्वर बुलियन गोल्ड नामक कंपनीसाठी मोहमद आणि इतरांची नेमणूक केली होती. त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांकडून एकूण ५ कोटी ७९लाख ७७ हजार
रुपये एवढी रक्कम गोळा करून आपल्या कंपनीत हस्तांतरित केली होती.
त्या रकमेपोटी त्याना आपल्या कंपनीतून स्वस्तात सोने (नाणी, बिस्किट) देण्याची हमी दिली होती. हा सर्व व्यवहार फेब्रुवारी २०२३ या महिन्यात घडला . तक्रारदारांना या व्यवहारासंबंधात संशय आल्याने त्यांनी अक्षयकडे पैशांसाठी तगादा लावला असता त्यांना सोने किंवा रक्कम देण्यात आली नाही. या संबंधांत तक्रारदारांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अक्षयविरुद्ध भा.दं.सं.४२० कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक प्रभू भट पुढील तपास करीत आहेत.