२४ तासांत ६ इंच 'कोसळला'; राजधानी पणजीत ८ इंचांसह अतिवृष्टी, राज्यभरात पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:19 AM2023-06-29T10:19:53+5:302023-06-29T10:20:26+5:30
गोव्यात जोरदार तर पणजीत अतिवृष्टी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ६ इंच पाऊस पडला, तर राजधानी पणजीत ८ इंचाहून अधिक पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील मान्सूनसाठी पोषक वातावरणामुळे हा पाऊस पडला. गोव्यात जोरदार तर पणजीत अतिवृष्टी झाली.
मान्सूनची तूट १६ टक्क्याने भरून काढणारा पाऊस मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या २४ तासांत पडला. जुने गोवेत ७ इंच, फोंड्यात ४ इंच तर काणकोण व मडगावात ५ इंच, पेडणेत ७.६ इंच आणि जुने गोवेत ६ इंच इतका पाऊस पडला. गोव्यात २४ तासांत सरासरी ६ इंच इतका पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. रात्री पावसामुळे एकूण हंगामी पाऊस २० इंच इतका झाला आहे. आजच्या तारखेला सामान्य प्रमाणानुसार, ३२ इंच पाऊस पडणे अपेक्षित असला, तरी रात्री पडलेल्या ६ इंच पावसामुळे फार मोठी तूट भरून निघाली आहे. आता ३८ टक्के तूट राहिली आहे.
अरबी समुद्रावर मान्सूनसाठी पोषक वातावरण आहेत. पावसाचे ढग ईशान्येकडे सरकत आहेत, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर आहे, शिवाय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही गोवा, आंध्र व ओडिशासह इतर भागात अधिक प्रमाणावर पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
केसरी अलर्ट
अत्यंत सक्रिय बनलेला मान्सून अजूनही दोन दिवस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारबरोबर आज, गुरुवारीही जोरदार पावसाची शक्यता दर्शविणारा केसरी अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
झाडे पडली; दरड कोसळली
मुरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चार ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तर तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती वास्को अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. मेरसीसवाडे, वाडे, हार्बर होलान्त येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या, तर रुमडावाडा- डोंगरी व अपर जेटी परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली.
पावसामुळे कठड्यासह दुचाकीही पडली विहिरीत
शेटये वाडा म्हापसा येथे विहिरीचा कठडा कोसळल्याने कठड्याला लागून पार्क केलेली दुचाकी विहिरीत पडण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ६:३० च्या सुमारास घडली. विहिरीच्या चारही बाजूने सुरक्षेसाठी उभारण्यात आलेला कठडा कोसळून विहिरीत पडला. त्याच्याबरोबर दुचाकीसुद्धा पाण्यात पडली. घटनेमुळे विहिरीला लागून असलेल्या घराला धोका निर्माण झाला आहे. कुंदन गडेकर यांच्या घरानजीक हा प्रकार घडला. दरम्यान, कोलवाळ येथे भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात ट्रक रुतल्याने तेथील वाहतुकीवर परिणाम झाला.
सासष्टीतही पडझड
पावसामुळे काल, बुधवारी सासष्टीत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. सुरावली, मोड्डी नावेली, तसेच घोगळ हाउसिंग बोर्ड येथे रस्त्यावर झाड पडले. यात कुठलीही हानी झाली नाही. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत, झाडाच्या फांद्या कापून रस्ता सुरळीत केला.