तीन महिन्यांत ६ लाख प्रवासी; मोपा विमानतळाला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:54 AM2023-03-22T09:54:04+5:302023-03-22T09:55:27+5:30
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत सहा लाख प्रवाशांचे आगमन झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेः मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत सहा लाख प्रवाशांचे आगमन झाले आहे. तर दुसरीकडे दर दिवशी साडेचार हजार टॅक्सी प्रवाशांना घेऊन फेऱ्या मारत आहेत.
पेडणे तालुक्यातील या विमानतळामुळे पूर्ण पेडणे तालुक्याचा कायापालट होणार आहे. हे चित्र आशादायी ठरत असतानाच तालुक्याचे दोन्ही लोकप्रतिनिधी सर्व पंचायतींची पंचायत मंडळाने, नागरिक, सामाजिक संस्थेच्या संबंधिताने एकत्रित येऊन जर या मोपा विमानतळाचा लाभ घेतला तर सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्या नजरेतून आता आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुढाकार घेऊन मोपा विमानतळावरील जे रोजगार व्यवसाय निर्माण होणार आहेत. यासाठी सरकारच्या माध्यमातून त्यांनी स्थानिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार, मोपा विमानतळावरून दर दिवशी ३६ विमाने ये-जा करत असतात. त्यामुळे दिवसाला साडेचार हजारपेक्षा जास्त टॅक्सी फेऱ्या मारत असतात. येथे आतापर्यंत सहा लाख पेक्षा जास्त पर्यटकांचे विमानातून आगमन झाले असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
मोपा विमानतळावर नोकऱ्या किंवा व्यवसाय स्थानिकांना उपलब्ध होत नसल्यामुळे थोडी खुशी आणि थोडा गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधीने आणि स्थानिक पंचायतीच्या प्रतिनिधीने एकत्रित येऊन आपापल्या गावांमधील बेरोजगार युवक, टॅक्सी व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापार करणारे व्यावसायिक यांना संघटित करून त्याचा लाभ मिळवून दिला तर मोपा विमानतळ हा पेडणेवासीयांना वरदान ठरू शकतो. विमानतळासाठी मोपा, चांदेल, कासारवर्णे, उगवे, वारखंड या गावांच्या जमिनी गेलेल्या आहेत. चांदेल पंचायत क्षेत्रातील ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या ५० टक्के पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे. मोपा पंचायत क्षेत्रातील ८० टक्के लोकांनी हक्क सादर करून पैसे घेतलेले आहेत; वारखंड पंचायत क्षेत्रातील ९० टक्के शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही. ज्यांच्या जमिनी जाणत्यांच्या नावावर आहेत, पूर्वजांच्या नावावर आहेत, त्यातील काही पूर्वज काही जाणकारांचा मृत्यू झालेला आहे. मोपा विमानतळामुळे तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत; परंतु त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पेडणे तालुक्यातील दोन्ही लोकप्रतिनिधींनी आणि स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन गरजवंत बेरोजगार युवकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
जी.एम.आर कंपनीने प्रकल्प उभारला आहे. कंपनीने याच प्रकल्पाच्या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारून वेगवेगळ्या एकूण १७ कोर्स प्रशिक्षण वर्गाची सोय केलेली आहे. त्या बाहेरच्याही युवकांनी या प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण घेऊन काही प्रशिक्षण कालावधी दोन महिने, चार महिने, सहा महिने असा आहे.
पेडणे तालुक्यातील ज्यांच्या जमिनी मोपा विमानतळासाठी गेलेल्या आहेत त्या संबंधितांनी, पीडित शेतकऱ्यांनी, काही व्यावसायिकांनी टॅक्सी विकत घेऊन टॅक्सीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे; परंतु टॅक्सी व्यावसायिकामध्ये दोन पेक्षा तीन गट तयार झाल्यामुळे त्यांचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"