टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 06:27 PM2019-09-05T18:27:25+5:302019-09-05T18:28:25+5:30
टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पेडणो तालुक्यातील तुयें येथे आरक्षित करण्यात आली आहे.
पणजी: टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पेडणो तालुक्यातील तुयें येथे आरक्षित करण्यात आली आहे. त्याविषयीची अधिसूचना गुरुवारी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने जारी केली आहे.
तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणली जाईल, असे ढोल सरकारी यंत्रणांकडून गेली पाच वर्षे वाजविले जात आहेत. तथापि, ती जागा अजून टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी आरक्षित झाली नव्हती. आता अधिसूचना जारी झाल्याने त्या जागेत ग्रामपंचायतीला काही अधिकार राहणार नाहीत. सरकारच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाला आता तुयेंतील जमिनीविषयी सर्व अधिकार प्राप्त होत आहेत. एकूण 5 लाख 97 हजार 125 चौरस मीटरच्या त्या जागेत जी बांधकामे उभी राहतील, त्या बांधकामांना परवाने देणो किंवा त्यांच्याकडून कर गोळा करणो, शूल्क जमा करून घेणो असे अधिकार पंचायतीला नसतील. पंचायतीला माहिती तंत्रज्ञान महामंडळ नुकसान भरपाई देणार आहे.
यापूर्वी चिंबल येथील पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा सरकारने आयटी पार्कसाठी आरक्षित करणारी अधिसूचना जारी केली. तुयें येथील जागेत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योग आणण्याचा सरकारचा विचार कायम आहे की तो रद्द झाला असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला होता. तथापि, जागेविषयीची अधिसूचना जारी झाल्याने आता तो संभ्रम दूर झाला आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक डेरिक नेटो यांच्या सहीने ही अधिसूचना जारी झाली आहे. वेगवेगळ्य़ा एकूण 23 सव्रे क्रमांकाच्या जमिनींचा या क्षेत्रफळात समावेश आहे. तसेच लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना तुयें येथे सरकारने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.