पक्ष सोडलेले सहा ते आठ नेते पुन्हा मगोप प्रवेशाच्या तयारीत: सुदिन ढवळीकर
By किशोर कुबल | Published: April 14, 2024 02:29 PM2024-04-14T14:29:21+5:302024-04-14T14:30:36+5:30
दाबोळीचे प्रेमानंद नानोस्कर स्वगृही
किशोर कुबल, पणजी : यापूर्वी वेगवेगळ्या कारणास्तव मगोप सोडला असे सहा ते आठ नेते पुन्हा पक्षात येण्यास तयार आहेत, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. दाबोळीचे २०१७ चे मगोप उमेदवार प्रेमानंद नानोस्कर हे मध्यंतरी ‘आप’मध्ये गेले होते. काल त्यांनी समर्थकांसह पुन्हा मगोपत प्रवेश केला.
या प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर म्हणाले की, ‘ज्या नेत्यांनी मगोप सोडला पण कधीही पक्षाविरुध्द अथवा पक्षाच संस्थापक गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविरुध्द टीका केलेली नाही अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय मगोपच्या केंद्रीय समितीने घेतलेला आहे.’
‘कॉग्रेसची गोव्यात ही अखेरची लोकसभा निवडणूक ठरणार’
मडकई मतदारसंघात कॉग्रेस पक्ष नावालाही राहिलेला नाही तशीच गत या पक्षाची संपूर्ण गोव्यातही होईल. कॉग्रेस अखेरच्या घटका मोजत असून या पक्षासाठी गोव्यात लोकसभेची ही अखेरची निवडणूक ठरेल. कॉग्रेसचे जे तीन आमदार सध्या शिल्लक राहिले आहेत. तेसुध्दा लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जातील.