फुटीर आमदारांना ६ आठवड्यांची मुदत; अपात्रता याचिकेवर ५ एप्रिल रोजी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:51 PM2023-02-14T12:51:43+5:302023-02-14T12:52:30+5:30
आठ काँग्रेसी फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.
पणजी: आठ काँग्रेसी फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सभापतींनी आठही आमदारांना उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली असून सुनावणी ५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. काँग्रेसचे नेते डॉम्निक नोरोन्हा यांनी दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, राजेश फलदेसाई. डिलायला लोबो केदार नाईक व रुडॉल्फ फर्नांडिस या आठ फुटीर आमदारांविरुद्ध सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली होती.
सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे आठ आमदार प्रत्यक्ष फटल्यानंतर नोरोन्द्रा यांनी सर्व आठही आमदारांविरुद्ध सादर केलेल्या याचिकेवर पहिली सुनावणी आज सभापतींनी घेतली. फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांचे वकील अभिजित कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्वेरा यांनी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली. दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेगांव यांनी यावर केवळ एका ओळीची प्रतिक्रिया देताना न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सभापतींनी कामकाजात घेतलेली ही याचिका प्रत्यक्ष फुटी पूर्वीची आहे. गेल्या जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी काँग्रेसच्या इतर पाच आमदारांसह कॉंग्रेसमधून फुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु फुटीसाठी दोन-तृतीयांश संख्याबळ न झाल्याने व केवळ सातच आमदार झाल्याने तेव्हा ही फूट बारगळली. परंतु नंतर सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात फूट पडलीच.
जुलैमध्ये पक्षांतराच्या हालचालीनंतर पाटकर यांनी सभापतींकडे वरील दोघांविरुद्ध ही अपात्रता याचिका सादर केली होती. १६ डिसेंबर रोजी ती सुनावणीस आली असता दोघांनाही म्हणणे मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार दोघांनीही उत्तरादाखल प्रतिज्ञापत्रे सादर केलेली आहेत.
'त्या' याचिकेवर आता सुनावणी ६ मार्चला होणार
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या विरोधात सादर केलेली अपात्रता याचिका सभापतींसमोर आली. दोघांनीही उत्तरादाखल प्रतिज्ञापत्रे सादर केली असून सभापतींनी पुढील सुनावणी ६ मार्च रोजी ठेवली आहे. पाटकर यांच्या वतीने अॅड. अभिजित गोसावी काम पाहत आहेत. गोसावी यांनी पत्रकारांना सांगितले की, सुनावणीला प्रतिवाद्यांचे वकीलही उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. प्रतिज्ञापत्राची प्रत सभापतींनी आम्हाला दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"