युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे : मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Updated: June 19, 2024 15:13 IST2024-06-19T15:12:46+5:302024-06-19T15:13:12+5:30
तामनारचे उद्घाटन ॲाक्टोबरपूर्वी

युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे : मुख्यमंत्री
पणजी : युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ केलेली आहे. ही वाढ तशी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे, असा दावा करीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दरवाढीचे समर्थन केले. दुसरीकडे तामनार वीज प्रकल्पाचे उद्घाटन येत्या ॲाक्टोबरपर्यंत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की,‘वीज दरवाढ संयुक्त वीज नियामक आयोग ठरवतो. सरकार नव्हे!. दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारकडून सबसिडी मिळणार. दरवाढ न करता राज्य सरकार जर सबसिडी देत राहिले तर केंद्र काहीच देणार नाही.’ मुख्यमंत्री म्हणाले की घरगुती वापराच्या विजेसाठी ही दरवाढ तशी मोठी नाही. काही प्रमाणात व्यावसायिक आस्थापनांना झळ बसेल. सरकारने गेल्या पाच वर्षात भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारणांवर २ हजार कोटी रुपये खर्च केले. लोकांना वीज खंडित झाली तरीही ते चालत नाही. दर्जेदार वीज हवी असेल तर खर्चही करावा लागणार. त्यासाठी दरवाढ अटळ आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारकडून २५०० कोटी केंद्राकडून सबसिडी मिळू शकते. दर न वाढवल्यास हा निधी मिळू शकणार नाही. आम्ही प्रस्ताव पाठवणार आहेात. ते पुढे म्हणाले की, ‘ राज्यात वीज पायाभूत सुविध वाढवण्यासाठी आणखी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशभरात घरांना भूमिगत केबल देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. इतर राज्यांमध्ये कारखान्यांना भूमिगत केबलसाठी प्राधान्य दिले जाते. गोव्यात भारनियमन किंवा शटडाउन घेतले जात नाही. शेजारी राज्यात हा प्रकार चालतो. संपूर्ण दिवस वीज बंद असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, तामनार प्रकल्पाला विरोध होत असतानाच सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट झालेली आहे. अवघेच काही काम बाकी आहे. येत्या ॲाक्टोबरपर्यंत उद्घाटन होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.