६०७ वेळा 'कदंब'ने दिला दगा, ब्रेकडाउन समस्या कायम; ६२ टक्के बसेस १५ वर्षे जुन्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 09:23 AM2023-08-02T09:23:10+5:302023-08-02T09:23:44+5:30
बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामीण भागांत वाहतूक व्यवस्था सुरळीत करा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कदंब बसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांत ६०७ वेळा या बस ब्रेकडाउन झाल्या आहेत, तर २९ वेळा दुरुस्ती करूनही या बसमधून प्रवास करणे प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.
वाहतूक, पंचायत, उद्योग या खात्यांवरील अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. कदंब महामंडळाअंतर्गत ५२० बस धावतात. त्यापैकी ३२३ बस म्हणजेच ६२ टक्के बस या १५ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या बस घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कदंब बस प्रवाशांसाठी असुरक्षित आहेत. मागील काही वर्षांत जवळपास ६०७ वेळा या बस ब्रेकडाउन, तर २९ वेळा दुरुस्तीसाठी काढल्या आहेत. कदंबच्या देखभालीचा खर्च यंदा वाढला असून तो ५ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बसच्या नेमक्या स्थितीवर चिंता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थी हे मडगावहून पणजीला शिक्षणासाठी येतात; मात्र पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहे.
बस वेळेत मिळत नसल्याने खचाखच भरलेल्या बसमधून त्यांना प्रवास करावा लागत आहे. सरकारने दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणाऱ्या बसची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
हा निव्वळ भुर्दड
पर्यटक टॅक्सीमालकांकडून मीटर देखभाल शुल्क म्हणून ४ हजार २०० रुपये आकारले जात आहे. अगोदरच टॅक्सीमालकांना २१ हजार रुपये भरून मीटर बसविले आहेत. त्यात आता त्यांना है देखभाल शुल्क लागू केल्याने अन्याय होत आहे. खाण ट्रक २५ वर्षे झाल्यानंतर स्क्रॅप करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
सत्तरी येथील ग्रामीण भागांमध्ये बसेसची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वेळेत बस नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेची समस्या सोडवावी, अशी मागणी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केली.
वाहतूक, उद्योग व पंचायत खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी त्या बोलत होत्या. कदंब महामंडळाने ग्रामीण भागांमध्ये नियमितपणे ठरावीक वेळेत बसेसच्या फेन्या वाढविणे गरजेचे आहे. बसेस नसल्याने विद्यार्थ्यांप्रमाणेच कामानिमित्त ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे.
डॉ. राणे म्हणाल्या, वाळपई ते पर्येदरम्यान बससेवा सुरू व्हायला पाहिजे; कारण या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पयें येथील काही भागांमध्ये सकाळी व त्यानंतर थेट संध्याकाळी अशी दोन वेळाच बससेवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. दुपारी शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना बस नसल्याने संध्याकाळी ५.३० च्या बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे दुपारी शाळा सुटूनही ते घरी संध्याकाळी उशिरा पोहोचतात. ग्रामीण भागांत बसची कमतरता असून बसची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा
पंचायत कर्मचायांना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे पगार द्यावा. सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच पंचायतीचे अन्य रोजचे काम हे कर्मचारी करतात. त्यामुळे त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच ज्या पंचायतींमध्ये कर्मचायांची संख्या कमी आहे, तेथे अतिरिक्त्त कर्मचारी नियुक्त करावी, अशी मागणी डॉ. राणे यांनी केली.