घरावर दरड कोसळल्याने ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 07:14 PM2020-09-22T19:14:27+5:302020-09-22T19:14:42+5:30
वृद्ध महिलेचा ३५ वर्षीय मुलगा सुखरूप बचावला
वास्को: सोमवारी (दि.२१) रात्री ११ वाजता गोवा शिपयार्ड समोरील अंतर्गत रस्त्याच्या आत असलेल्या एका घरावर दरड कोसळून घराचा मोठा भाग जमिनदोस्त होण्याबरोबरच दरडी खाली चिरडून येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय अनिता बोरकर या वृद्ध महिलेचा दुर्देवी अंत झाला. दरड कोसळण्याच्या घटनेवेळी अनिता व तिचा ३५ वर्षीय मुलगा अजित घरात झोपले असून सुदैवाने याघटनेतून तो मात्र सुखरूप बचावला. या परिसरातील डोंगराळ भागातून आणखीन दरड कोसळण्याची भिती येथे राहणाºया नागरिकात व्यक्त केली जात असून भविष्यात आणखीन अनर्थ होण्यापूर्वीच प्रशासनाने लोकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उचित पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
सोमवारी सतत पडत असलेल्या मूसळधार पावसाच्या दरम्यान ही घटना घडली. गोवा शिपयार्ड समोरील अंतर्गत रस्त्याच्या आत असलेल्या एका घरात अनिता बोरकर व तिचा ३५ वर्षीय मुलगा अजित बोरकर राहत असून याच घराच्या दुसºया बाजूने त्यांचे अन्य नातेवाईक राहतात. अतिना व अजित राहत असलेल्या घराच्या बाहेरील परिसरात डोंगराळ भाग आहे. सोमवारी रात्री अजित घरात खाटेवर तर त्याची आई खाली झोपली होती. आई - मुलगा आपल्या घरात गाढ झोपले असता रात्री ११ च्या सुमारास भयंकर असा आवाज होऊन डोंगराळ भागातून मोठी दरड कोसळून तीन भले मोठे दगड तसेच मोठ्या प्रमाणात माती खाली उतरली. यापैंकी एक दगड जवळच असलेल्या विहरी जवळ तर दुसरा दगड येथेच असलेल्या अन्य एका घरासमोर कोसळला. तिसरा भला मोठा दगड अनिता बोरकर यांच्या घराचा जास्तित जास्त भाग जमिनदोस्त करीत घराचे छप्पर, भिंती पाडून आत शिरला. आपल्या घरावर दरड कोसळत असल्याची जाणीव अजित ला होताच त्याने उठून आपल्यासहीत आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरावर दरड कोसळली होती. अजितने आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला ती सापडली नाही. दरड कोसळल्याने अजित व त्याची आई आत अडकल्याचे येथे राहणाºया लोकांना समजताच त्यांनी त्याला त्वरित घरातून सुखरूप बाहेर काढले. तसेच त्यांनी अनिता हीचा शोध घेतला, मात्र त्यांना ती सापडली नाही. घरावर दरड कोसळून त्याच्या खाली महीला चिरडली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाला मिळताच रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन बचाव कार्याला सुरवात केली. अग्निशामक दलाने घराच्या पुढच्या बाजूची (जेथे दुसरे कुटूंब राहत होते) भिंत फोडून आत जाऊन अनिताचा शोध घेण्यास सुरवात केली, मात्र त्यांना ती सुरवातीला सापडली नाही. अनिता ही वृद्ध महीला दरडीखाली सापडल्याची जाणीव अग्निशामक दलाला झाल्यानंतर त्यांनी घरात शिरलेला भलामोठा दगड फोडण्यासाठी तसेच जमिनदोस्त झालेला घराचा भाग व दरडी हटवण्यासाठी यंत्र तसेच मुरगाव नगरपालिकेच्या कामगारांची मदत घेऊन अनिता या महीलेचा शोध घेण्यास सुरवात केली. ११.१५ वाजता दरडीखाली सापडलेल्या अनिता हीचा शोध घेण्याला सुरवात केल्यानंतर सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री ३.१५ च्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांना अनिताचा मृतदेह सापडला. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अनिताचा मृतदेह पोटाच्या बाजूने पडला असून दरड कोसळण्याची जाणीव झाल्याने कदाचित तीने स्व:ताला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असावे, मात्र दुर्देवाने तो पर्यंत उशिर झाला असावा. दरड कोसळून त्याच्याखाली सापडलेल्या अनिता हीला तेथून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला वास्को पोलीस अधिकारी व शिपायांची मदत लाभली अशी माहीती सूत्रांनी दिली. ६५ वर्षीय अनिताचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी तिच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास तो शवगृहात पाठवून दिला. दुर्देवी रित्या मरण पोचलेल्या अनिताच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर तिच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. मागच्या तीन ते चार वर्षापासून पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याचा प्रकार घडत असल्याची माहीती सूत्रांनी देऊन सोमवारी रात्री दरड कोसळून अनिता या वृद्ध महीलेचा मृत्यू झाल्याने याभागात राहणाºया नागरिकात दरड कोसळण्याच्या विषयावरून चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या परिसरातील डोंगरावरून आणखीन दरड कोसळण्याची भिती लोकात व्यक्त केली जात असून भविष्यात आणखीन कुठला अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने येथे राहणाऱ्या नागरिकाच्या हीतासाठी उचित पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. दरड कोसळून मरण पोचलेली अनिता आपल्या मुलासहीत राहत असून तिला तीन विविहीत मुली आहेत. काही वर्षापूर्वी तिच्या पतीचे तसेच एका मुलाचे निधन झाल्याची माहीती तिच्या परिचयाच्यांकडून प्राप्त झाली.