गोव्यात तीन महिन्यात ६६२ जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 01:03 PM2019-10-29T13:03:19+5:302019-10-29T13:08:12+5:30
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात ६६२ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
पणजी - राज्यातील प्रमुख महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांची ठिकठिकाणी खड्डे पडून चाळण झाली असली तरी बेदरकारपणे वेगाने वाहने हाकण्याचे प्रकार काही थांबलेले नसल्याचं चित्र गोव्यात पाहायला मिळत आहे. अतिवेगाने वाहन चालविले प्रकरणी गेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात ६६२ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या वाहतूक कक्षाने या काळात १५०१ वाहतूक उल्लंघनाचे गुन्हे नोंद केले. बेदरकारपणे गतीने वाहने चालविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दर तीन महिन्याला सुमारे ४०० परवाने याच कारणावरून निलंबित केले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रस्त्यावर खड्डे असतात तेथे साधारणपणे वाहन धीम्या गतीने चालवण्याचा प्रयत्न असतो परंतु काही ठिकाणी तरुण मुले दुचाकी किंवा चारचाकी वेगाने चालवत असतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. उत्तर गोव्याचे वाहतूक पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी सांगितले की, आम्ही काही जागा शोधून काढल्या आहेत, जिथे वाहने सावकाश चालवणे आवश्यक आहेत आणि तेथे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच शिवोली येथील पुलावर, पर्वरी येथे ओ कोकेरो जंक्शनजवळ तसेच दक्षिणेत कुंकळ्ळी येथे असे निर्बंध घालण्यात आल्याची माहिती आंगले यांनी दिली आहे.
अनेकदा तरुण मुले दुचाक्यांची शर्यत लावत असतात. अशी धूम कांपाल, मिरामार, पर्वरी भागात दिसून येते. सीसीटीव्ही कॅमेराद्वारेही असे प्रकार होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी एकूण १५४६ जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स वेगाने वाहने हाकल्याबद्दल निलंबित करण्यात आली. तीन महिन्यांच्या काळासाठी लायसन्स निलंबित केले जाते. यावर्षी २०१९ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १४८७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यांवर वाहन वेग निर्बंधाचे पुरेसे फलक आहेत तसेच गतिरोधकही आहेत. असे असताना काही तरुण वेगाने गाड्या चालवतात. रस्ता सुरक्षा सप्ताह नावापुरता ठरलेला आहे, असे ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले आहे.