गोव्यात 7 नव्या रुग्णवाहिका सुरू, 1 व्हीआयपी रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:59 PM2017-12-23T12:59:27+5:302017-12-23T12:59:52+5:30
गोव्यात 108 आपत्कालीन सेवेंतर्गत एकूण सात नव्या रुग्णवाहिका शनिवारी सुरू झाल्या.
पणजी : गोव्यात 108 आपत्कालीन सेवेअंतर्गत एकूण सात नव्या रुग्णवाहिका शनिवारी सुरू झाल्या. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. सात रुग्णवाहिकांमध्ये एक रुग्णवाहिका ही अतीमहनीय (व्हीआयपी) व्यक्तींसाठीची आहे. रुग्णवाहिकांची एकूण संख्या 42 पर्यंत वाढविली जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाबाहेर असलेल्या जागेत सात नव्या रुग्णवाहिकांच्या उद्घाटनाचा सोहळा शनिवारी सकाळी पार पडला. आरोग्य मंत्री विश्वजित राणो, गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. प्रदीप नाईक, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, अतिरिक्त आरोग्य सचिव सुनील मसुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
गोव्यात सध्या एकूण 33 रुग्णवाहिका आहेत. लवकरच त्यांची संख्या 38 होईल. म्हणजेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक रुग्णवाहिका असे प्रमाण होईल. यापुढे रुग्णवाहिकांची एकूण संख्या 45 करण्याचा विचार आहे. सध्याच्या नव्या रुग्णवाहिकांमध्ये वेन्टीलेटर्स व अन्य आधुनिक प्राथमिक सुविधा आहेत, असे मुख्यमंत्री र्पीकर यांनी सांगितले. गोव्याच्या आरोग्य क्षेत्रत अनेक नवे उपक्रम सुरू होत आहेत. केंद्र सरकारने विभागीय कॅन्सर सेंटर गोव्यातील बांबोळी येथे सुरू करण्यासाठी एकूण 45 कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यापैकी आठ कोटी रुपयांचा पहिला हप्ता गोव्याला प्राप्त झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्यातील सर्व सुपरस्पेशालिटी सुविधा एकाच प्रकल्पात यापुढे असतील. एकूण 32क् कोटी रुपयांचा प्रकल्प उभा केला जाईल. या प्रकल्पाचे काम येत्या महिन्यात सुरू होईल. पाचशे खाटांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून खर्च करील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, येत्या दि. 1 जानेवारीपासून परप्रांतीय रुग्णांवर गोव्यातील चार सरकारी इस्पितळांमध्ये मोफत उपचार करणो बंद होणार असले तरी, देखील आपत्कालीन स्थिती असेल तेव्हा मोफत उपचार केले जातील. आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर, तो रुग्ण गोमंतकीय आहे की परप्रांतीय आहे हे पाहिले जाणार नाही. मोफत उपचार होतील, असे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. आम्ही परप्रांतीयांवर उपचार करणार नाही असे मुळीच म्हटलेले नाही. फक्त परप्रांतीयांना थोडे शूल्क जमा करावे लागेल. कारण गोव्यातील आरोग्य सेवांचे पहिले प्राधान्य हे गोव्याच्या रुग्णांची काळजी घ्यावी असे आहे. तथापि, अपघात किंवा अन्य आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर परप्रांतीय रुग्णावर मोफत उपचार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.