७० हजार गोंयकारांनी सोडले भारतीय नागरिकत्व; पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहितीतून सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:53 AM2023-06-28T09:53:04+5:302023-06-28T09:54:31+5:30
गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०११ ते २०२२ या ११ वर्षांच्या काळात ६९,३०३ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती गोवा पासपोर्ट कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.
नोकरी, व्यवसायासाठी देशाचे नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मागील ११ वर्षांत सुमारे १६.२१ लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यांचे पासपोर्ट देशभरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये जमा केले आहेत. नागरिकता सोडणाऱ्यात आठ राज्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यातही गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
जमा केलेल्या ६९.३०३ पासपोर्टपैकी ४०.४५ टक्के पासपोर्ट गोव्यातील आरपीओमध्ये आत्मसमर्पण करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात सामायिक केलेली आकडेवारी उघड करते.
एकूण नागरिकता सोडणाऱ्यात ९० टक्के लोक हे गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि चंदीगड येथील आहेत. त्यातही ६९.३०३ म्हणजेच ४०.४५ टक्के गोव्यातील लोक आहेत. देश सोडणाऱ्याा गोव्यातील लोकांत पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारणारे सर्वाधिक आहेत. तसेच इंग्लंडचे नागरिकत्व घेतलेलेही आहेत.
१६.२१ लाख लोकांनी नागरिकत्व सोडले
२०११ पासून आरपीओमध्ये आत्मसमर्पण केलेले ६९,३०३ पासपोर्ट, या कालावधीत सोडण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वाचा केवळ एक अंश आहे. २०११ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १६.२१ लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली