७० वर्षाचा रोग १७ महिन्यात संपवायचा आहे - मोदी
By admin | Published: November 13, 2016 12:40 PM2016-11-13T12:40:59+5:302016-11-13T14:24:26+5:30
नोटबंदीमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. थोड्या दिवसांनतर सर्व काही सुरळीत होईल. नोटबंदीला अर्ध्यापेक्षा जास्त नेत्यांचा विरोध होता.
ऑनलाइन लोकमत
गोवा, दि. १३ - भ्रष्टाचार ही देशातील मोठी समस्या आहे. गेल्या 70 वर्षांपासूनचा हा भ्रष्टाचाराचा रोग मला 17 महिन्यांत संपवायचा आहे. सरकारच्या कठोर निर्णयामुळे देशातील सामान्य जनतेला त्रास होत आहे. पण 50 दिवस थोडी कळ सोसा, असे भावूक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केले.
गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना मोदी म्हणाले, "सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्टाचार नष्ट करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. नोटबंदीमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. थोड्या दिवसांनतर सर्व काही सुरळीत होईल. नोटबंदीला अर्ध्यापेक्षा जास्त नेत्यांचा विरोध होता. नोटा बदलीच्या निर्णयावर बोलताना मोदी यावेळी भावूक झाले होते. सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही. मी खुर्चीसाठी जन्माला आलो नाही, देशासाठी घर-कुटुंब, संपत्ती सोडली आहे."
यावेळी मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढाई सुरू करून धोका पत्करला असल्याचेही सांगितले." मला माहीत आहे की भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढा सुरू करून मी कुणाशी वैर घेतले आहे. आता कोण कोण माझ्या विरोधात जाणार हेही मला माहीत आहे. कदाचीत ते मला संपवण्याचाही प्रयत्न करतील. त्यांना हवं ते करू द्या, पण मला पुढचे 50 दिवस तुमची साथ हवी आहे." असे पंतप्रधान म्हणाले.