गोव्यातील पोस्टमन हायटेक होणार; 700 कर्मचाऱ्यांच्या हातात स्मार्टफोन येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:54 PM2018-08-31T14:54:05+5:302018-08-31T14:56:34+5:30
उद्यापासून गोव्यात पेमेन्ट बँक सुरू होणार
पणजी : गोव्यातील पोस्टमन आता स्मार्ट होणार आहेत. एकूण सातशे पोस्टमनांच्या हाती स्मार्ट फोन असतील. गोव्यातील ज्या लोकांची, विशेषत: महिलांची बँकेमध्ये अजूनही खाती नाहीत, असे लोक पोस्टात खाते उघडू शकतील. विशेष म्हणजे या खात्यातून ग्राहक पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. ही रक्कम त्यांना घरबसल्या काढता येईल. केंद्र सरकारने जनधन योजना राबवली, तरीही देशातील 20 कोटी जनता अद्यापही बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर आहे.
गोव्याचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकविषयी माहिती दिली. येत्या 1 सप्टेंबरपासून ही बँक सुरू होत आहे. गोव्यातील पोस्टाच्या सहा शाखांमध्ये उद्यापासून ही बँक कार्यान्वीत होईल. गोव्यातील उर्वरित 257 पोस्ट कार्यालयांमध्ये ही बँक सेवा अॅक्सेस केंद्रांच्या रुपाने या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल, असे डॉ. विनोदकुमार यांनी सांगितले. सध्या पोस्ट खात्याकडे 30 स्मार्ट फोन आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत सर्व 700 पोस्टमनकडे स्मार्ट फोन असतील, असे विनोदकुमार म्हणाले.
गेल्या तीन दिवसांत सुमारे 2 हजार गोमंतकीयांनी पोस्टात बँक खाती उघडली आहेत. त्यापैकी 90 टक्के व्यक्तींनी स्मार्ट फोनचा वापर करून खाती उघडली. गोव्यातील कुठल्याही भागातील पुरुष किंवा महिलेला जर स्मार्ट फोन नीट वापरता येत नसेल, तर पोस्टमन त्यासाठी त्यांना मदत करतील. पोस्टमधील खाते हे आधारकार्डावर आधारित असेल. त्यामुळे घोटाळा वगैरे होणार नाही, असे विनोदकुमार म्हणाले. 'खात्यात किमान रक्कम किती असावी याबाबत काही नियम नाहीत. या खात्यात रक्कम ठेवली नाही, तरीही चालू शकेल. मात्र स्वत:च्या खात्यातील पैसे जर खातेधारकाला घरबसल्या काढायचे असतील, तर तो फक्त पाच हजार रुपये काढू शकेल. ते पाच हजार रुपये पोस्टमन त्याला 48 तासांच्या आत घरी आणून देईल. पण जर पाच हजारपेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर त्या खातेधारकाला संबंधित पोस्ट कार्यालयात जावे लागेल, असे विनोदकुमार यांनी स्पष्ट केले. शनिवारी फोनद्वारे पैसे काढण्याची विनंती नोंदवली असेल, तर मात्र पैसे सोमवारी मिळतील. काही भागात मोबाईल रेंज व अन्य तत्सम तांत्रिक प्रश्न काही प्रमाणात येतील असे ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.
देशातील 20 कोटी लोकांकडे अजूनही बँकेत खाती नाहीत, असे आढळून आले आहे. यापैकी 60 टक्के महिला आहेत. किती गोमंतकीयांकडे बँक खाती नाहीत याची माहिती प्राप्त झालेली नाही. राज्यात 400 ग्रामीण पोस्टमन आहेत. पणजीतील 16 व मडगावमधील 11 पोस्टमनकडे सद्या स्मार्ट फोन आहेत व त्यांचा वापर सुरू झाला आहे. उद्यापासून राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गोवा विभागातील सहा पोस्ट शाखांमध्ये पेमेन्ट बँका सुरू होतील.