८९ पर्यावरण दाखल्यांचे निलंबन केंद्र घेणार मागे!
By admin | Published: March 15, 2015 02:53 AM2015-03-15T02:53:25+5:302015-03-15T03:00:22+5:30
पणजी : गोव्यातील ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन
पणजी : गोव्यातील ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दिले आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पर्यावरणमंत्र्यांशी संपर्क साधून खाणबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली आणि खाणबंदी उठविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली. ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्च रोजी सुरू होत असून २५ मार्च रोजी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वीच खाणपरवान्याची निलंबने मागे घेण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. खाणींच्या परवान्यांचे निलंबन मागे घेतल्यास खाणी लवकर सुरू होण्याची शक्यता बळावणार आहे. तसेच महसूल तुटीच्या फटक्यातून सावरण्यासाठीही सरकारला मदत होणार आहे. हा निर्णय केंद्राने लवकर घेतल्यास अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यासही सरकारला नैतिक पाठबळ मिळणार आहे.
दरम्यान, खाणींच्या कॅपिंगची माहिती राज्य सरकारने केंद्राला सादर केली आहे. त्यात खाण निहाय उत्पादन मर्यादाचा उल्लेख आहे. कॅपिंगच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नसल्याचा सरकारचा दावा असून सीईसीच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)