८ मतदान केंद्रे संवेदनशील
By Admin | Published: March 17, 2015 01:39 AM2015-03-17T01:39:46+5:302015-03-17T01:41:53+5:30
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपली. बुधवारी दक्षिण आणि उत्तरेतील मिळून
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपली. बुधवारी दक्षिण आणि उत्तरेतील मिळून ५0 मतदारसंघांमध्ये ७ लाख ८0 हजार ५१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून उत्तरेत ७ व दक्षिणेत १ मिळून ८ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, एकही केंद्र अतिसंवेदनशील नाही. मात्र, संवेदनशील केंद्रांमध्ये रेईश मागूश, चिंबल, ताळगाव, शेल्डे आदी मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात ३ लाख ८९ हजार ४५५, तर दक्षिण गोव्यात ३ लाख ९१ हजार ६८ मतदार आहेत. भाजप उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ मिळून एकूण ३४ जागांवर, मगो उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९ जागांवर निवडणूक लढवीत आहे, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये १४९ अपक्ष रिंगणात आहेत. एकूण १९२ उमेदवार या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत.
मतदान बुधवार, १८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. ५ वाजता रांगेत असलेल्यांना मतदान करता येईल. नंतर आलेल्यांना मतदान करता येणार नाही. मतमोजणी २0 रोजी होणार असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २५ मतमोजणी केंद्रांची व्यवस्था केलेली आहे. मतदान मतपत्रिकांद्वारेच होणार असून मतपेट्या संबंधित केंद्रांवर मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून रवाना होतील.
अशी आहे राखीवता...
उत्तर गोव्यात १५, तर दक्षिण गोव्यात १४ मतदारसंघ राखीव आहेत. सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी ६ आणि ४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे १ व २, अनुसूचित महिलांसाठी अनुक्रमे १ व २, ओबीसी उमेदवारांसाठी अनुक्रमे ५ व ४, ओबीसी महिलांसाठी अनुक्रमे ३ व २ जागा राखीव आहेत.
उत्तर गोव्यात ६२८ आणि दक्षिण गोव्यात ५८१ मिळून एकूण १२0९ मतदान केंद्रे आहेत. ४00 पेक्षा कमी मतदारसंख्या असलेली ७५ केंद्रे आहेत. ४00 ते ८00 मतदारसंख्या असलेली ९0७ केंद्रे, तर ८00 पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेली २२७ मतदान केंद्रे आहेत.
निवडणूकविषयक पाच किरकोळ तक्रारी आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याबाबत चौकशी सुरू आहे. उत्तर गोव्यात ४, तर दक्षिण गोव्यात १ तक्रार आली आहे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्या तरच त्या आपल्याकडे येतात, असे मुदस्सीर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव डांगी, उत्तर गोव्याचे निवडणूक अधिकारी साबाजी शेटये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)