४ दिवसात ८० लाखांचा ड्रग्स जप्त; गोव्यात ड्रग्स विरोधी जोरदार मोहीम
By वासुदेव.पागी | Published: May 3, 2023 07:56 PM2023-05-03T19:56:34+5:302023-05-03T19:57:05+5:30
२९ एप्रिल रोजी एसीबीकडून मांद्रे येथे टाकलेल्या छाप्यांनंतर ड्रग्स विरोधी मोहिमेने वेग घेतला.
पणजी : या आठवड्यात गोव्यात ड्रग्स विरोधी मोहीम जोरात चालली असून २९ एप्रील ते २ मे दरम्यानच्या चारच दिवसात तब्बल तीन मोठ्या कारवाईत ८० लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणे कोणतीही गोष्ट गांभिर्याने घेतल्यास कोणतीही आव्हाने पेली शकतात हे पुन्हा एखदा सिद्ध झाले आहे.
अंमली पदार्थांचे व्यवहार रोखण्यासाठीच स्थापन करण्यात आलेल्या गोवा पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी विभाग आणि राष्ट्रीय नार्कोटीक नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अंमली पदार्थांच्या व्यवहारावर जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोण किती व कशी कारवाई करतो या बाबतीत एकमेकांशी स्पर्धाच चालली आहे. चार दिवसात दोन्ही एजन्सीकडून आणि गोवा पोलिसांच्या इतर विभागांकडून मिळून जवळ जवळ ८० लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ४ छाप्यात एकूण ७ जणांना अटक करण्यात आले आहे. ही मोहीम अशीच चालू राहणार असल्यामुळे येत्या काही दिवसात आणखी छापामारी होण्याचे संकेत आहेत.
२९ एप्रिल रोजी एसीबीकडून मांद्रे येथे टाकलेल्या छाप्यांनंतर ड्रग्स विरोधी मोहिमेने वेग घेतला. कारण हा छापा फार मोठा होता. या छाप्यात विविध प्रकारचे घातक विदेशी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ३० लाख रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त करण्यात आलेला हा अलिकडील काळातील फार मोठा छापा होता. तसेच जलतरण क्रीडा प्रकारात रौप्य पदक विजेत्या रशियन माजी ऑल्मिपीकपटूलाही या छाप्या अटक करण्यात आल्यामुळे हा छापा राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय झाला.
मांद्रेतील छाप्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० रोजी गिरी - म्हापसा येते अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून असाच मोठा छापा टाकण्यात आला. या छाप्यात एकालाच अटक करण्यात आली असली तरी २१ लाख रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त करण्यात आला. त्यानंतर दोन छोटे दीड लाख रुपयांचा ड्रग्स जप करणारे छापे झाले आणि २ मे रोजी एसीबीने पुन्हा एखदा मोठी कारवाई करून हणजुणेत एलएसडी हा अंमली पदार्थ बनविणारी फॅक्ट्रीच उद्धवस्त केली. २१ लाख रुपयांचा ड्रग्स या ठिकाणी सापडला.