गोव्यात 80 टक्के खाणी बंद, शुक्रवारपासून संपूर्ण बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 07:29 PM2018-03-12T19:29:16+5:302018-03-12T19:29:16+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे.
पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे. गोव्यातील या स्थितीची कल्पना देण्यासाठी भाजपाचे गोव्यातील तिन्ही खासदार आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
सरकारच्या खाण खात्याने अगोदर खनिज खाण उत्पादन येत्या दि. 13 पासून बंद व्हायला हवे असा आदेश जारी केला होता. त्या आदेशानुसार आज मंगळवारी खनिज खाण व्यवसाय बंद होणार होता. मात्र बार्ज मालक संघटना तसेच खनिज खाणींशीनिगडीत अन्य खनिज व्यवसायिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोट ठेवले व दि. 13 ऐवजी दि. 16 मार्चपासून खनिज खाणी बंद व्हायला हव्यात असा मुद्दा सरकारकरडे मांडला. न्यायालयाने दि. 16 पासून खाणी बंद करण्याचा आदेश दिला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सोमवारी सुधारित आदेश जारी केला. येत्या दि. 15 पर्यंत खनिज खाणी सुरू राहतील असे जाहीर केले. मात्र 15 रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून खनिज वाहतूक राज्यभर पूर्णपणे बंद होईल, असे जाहीर केले आहे. एरव्हीही रोज सायंकाळी सात वाजता खनिज वाहतूक बंद होत असते. खनिज खाण बंदीवर खाण खात्यासह इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचेही यावर लक्ष असेल. लिज धारकांना दि. 15 मार्चर्पयत खाण व्यवसाय करता येईल. त्यानंतर करता येणार नाही. दि. 16 पासून खाणींवर शुकशुकाट असेल. जोपर्यंत नव्याने लिज आणि पर्यावरणविषयक दाखला (ईसी) मिळत नाही, तोर्पयत कुणालाच खाण व्यवसाय करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दि. 7 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशाप्रमाणो गोव्यातील सर्व 88 लिजेस रद्दबातल ठरली आहेत.
खनिज खाण बंद करण्यापूर्वी खाणीच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करावी, असे केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा संचालनालयाने सर्व गोव्यातील लिजधारक, खाण मालक, एजंट्स व खाणींच्या व्यवस्थापकांना कळवले आहे. गोव्यातील लिजांचा लिलाव करावा की अन्य कोणती पाऊले उचलावीत हे राज्य सरकारने अजून ठरवलेले नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय माईन्स व मिनरल्स डेव्हलपमेन्ट अॅण्ड रेग्यूलेशन कायद्यानुसार लिजांचा लिलाव करावा लागेल याची कल्पना सरकारला आहे, असे सुत्रांनी सांगितले.
गोव्यातील खनिज खाणींनी पॅकिंग सुरू केले असून 80 टक्के खाणी बंद झाल्या आहेत. फक्त दोन-तीन खनिज खाणी सुरू आहेत, त्यांचे काम गुरुवारी सायंकाळर्पयत बंद होईल, असे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सोमवारी लोकमतला सांगितले. खाणी बंद झाल्यानेच सध्या रोजचे खनिज उत्पादन केवळ 27 हजार टनांर्पयत खाली आले आहे. गेल्या 9 रोजी हे प्रमाण 40 हजार टन एवढे होते. न्यायालयाने सर्व खाणींसाठी मिळून वार्षिक उत्पादन 20 दशलक्ष टन एवढी ठरवली आहे पण यावेळी फक्त 10.3 दशलक्ष टन एवढे उत्पादन झाले असल्याचे आचार्य यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील खनिज खाण बंदीविषयी मी, नरेंद्र सावईकर व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक असे तिघेही मिळून आम्ही मंगळवारी सकाळी अकरा वाजता अमित शहा यांना दिल्लीत भेटणार आहोत. खाण बंदीमुळे गोव्यात निर्माण झालेली स्थिती आम्ही शहा यांच्यासमोर मांडू. ते आम्हाला जशी सूचना करतील, त्यानुसार आम्ही पुढील पाऊले उचलू. त्यांनी जर केंद्रीय खाण मंत्री तोमर यांना किंवा जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांना भेटा अशी सूचना केली तर आम्ही त्यानुसार भेटी घेऊ.
- विनय तेंडुलकर