अबब... जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनात ८५ हजारांची बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:12 AM2019-03-18T02:12:45+5:302019-03-18T02:13:25+5:30

खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्याची स्थिती प्रचंड खालवल्याचे चित्र आहे. मात्र, तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पालकांची दानत ही खासगी शाळेच्या तोडीला कुठेच कमी नाही

85 thousand prizes in the reception of Zilla Parishad School | अबब... जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनात ८५ हजारांची बक्षिसे

अबब... जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनात ८५ हजारांची बक्षिसे

Next

निमोणे  - खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्याची स्थिती प्रचंड खालवल्याचे चित्र आहे. मात्र, तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पालकांची दानत ही खासगी शाळेच्या तोडीला कुठेच कमी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि त्याला निमित्त ठरले ते भैरवनाथवाडी (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाचे. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात कलेचा अविष्कार इतक्या प्रभावीपणे साकारला की उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाचा खिशाकडे हात गेला आणि हाताला येईल ती नोट त्यांनी त्या गीताला, डान्सला पारितोषिक म्हणून दिली. त्यामुळे या स्नेहसंमेलनाच्यानिमित्ताने बक्षिसापोटी तब्बल ८५ हजार रुपये जमा झाले.

भैरवानाथवाडी जिल्हा परिषदेच्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, पोवाडा, लोकगीते, भारुड, शेतकरी व्यथा, समाजप्रबोधनपर नाटिका, कोळीगीते अशा गीतांवरील नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रेक्षकांनी बाल कलाकारांवर बक्षिसांची खैरात केली. यावेळी प्रत्येक गाण्यानंतर पैठणीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराजांवर सादर झालेला पोवाडा हे या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व दुग्धसंवर्धन समितीच्या सभापती सुजाताताई पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, सरपंच मंगलताई म्हस्के, केंद्रप्रमुख लक्ष्मण काळे उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, भैरवनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

एरवी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी लोकवर्गणी मागितल्यावरही जितकी वर्गणी जमली नसती तितकी वर्गणी केवळ दोन-चार तासांच्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून जमली आहे. याचे सारे श्रेय शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच जाते. त्यामुळे या जमलेल्या बक्षिसाच्या रकमेतून विद्यार्थ्यांसाठीच शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्याकरिता वापरल्या जातील. - संतोष घावटे, मुख्याध्यापक

Web Title: 85 thousand prizes in the reception of Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.