वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:19 PM2018-10-07T14:19:39+5:302018-10-07T14:19:46+5:30
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पणजी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्वांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहेत. दिवसा व रात्रीच्या वेळीही सिग्नलचे संकेत न पाळणा-यांना पोलिसांनी लक्ष्य केले असून अचानक कारवाई करुन अशा चालकांना अडवून गुन्हा नोंदवण्याचा धडाका लावण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी तसे पत्रक जारी करून अशी कारवाई होणार असल्याचे जाहीर केले होते. रात्रीच्यावेळी पोलिसांनी सिग्नलच्या ठिकाणी राहून तशी कारवाई सुरूही केली. राज्यात सर्व सिग्नल्सच्या ठिकाणी पोलीस उभे होते.
या कारवाईत राज्यभर मिळून 88 जणांना सिग्नलचे संकेत न पाळण्यासाठी पकडण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. दंड व चालक परवाना निलंबनाची शिफारस अशी दुहेरी कारवाई करण्यात आली आहे. सर्व 88 चालकांचे परवाने वाहतूक खात्याकडे चालक परवाने रद्द करण्यासाठी पाठविले जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. चालू वर्षात अतापर्यंत 1403 जणांविरुद्ध वाहतूक सिग्नलचे संकेत न पाळण्यासाठी गुन्हे नोंदविण्यात आली आहेत. सर्वांविरुद्ध चालक परवाने निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. सिग्नल पाळल्या जात नसल्यामुळे अपघात घडतात त्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. केव्हाही कोणत्याहीवेळी आकस्मीक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.