कळंगुट येथील हॉटेलला ९ लाख रुपयांची टोपी; बील जमा न करता झाले पसार
By काशिराम म्हांबरे | Published: January 17, 2024 03:56 PM2024-01-17T15:56:18+5:302024-01-17T15:57:22+5:30
कळंगुट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काशिराम म्हांबरे, म्हापसा: कळंगुट येथील एका तारांकित हॉटेलात खोली बूक केलेल्या खोलीत ५ दिवसांची मजा लुटून ९ लाख रुपयांची टोपी घालून पसार झालेल्या ४ संशयिता विरोधात कळंगुट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नीलम हॉटेलचे व्यवस्थापक जेकब जॉन यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली आहे. खोल्या बुक करणारे व्यक्ती तरुण अगरवाल ( उत्तर प्रदेश ) एकेजी ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी ए के गुप्ता, मनीश कासना ( रायपूर ) तसेच रवितेज उर्फ प्रशांत कुमार ( म्हैसूर ) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद करुन घेण्यात आला आहे.
या चोघांनी ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत १२० व्यक्तींसाठी हॉटेलच्या ४५ खोल्या बुक केल्या होत्या. त्यानुसार १२० जण हॉटेलात येऊन राहिले. मजा लुटल्यानंतर ते परतले. या कालावधीत हॉटेलकडून पुरवण्यात आलेल्या सेवेचे एकूण १६ लाख ९ हजार ४४५ रुपये बील झाले. यातील केवळ ६ लाख ८८ हजार रुपये त्यांनी जमा केले. मात्र राहिलेली बाकी रक्कम ९ लाख २१ हजार ४४५ रुपये दिलेच नाही. त्यामुळे हॉटेलची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा नोंदवून निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कार्य आरंभले आहे.