९० टक्के जिल्हा रस्ते राष्ट्रीय महामार्ग
By admin | Published: March 4, 2017 01:52 AM2017-03-04T01:52:52+5:302017-03-04T01:53:07+5:30
बार्देस : राज्यात हायवेवरील बार, दारू दुकानांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील प्रमुख
बार्देस : राज्यात हायवेवरील बार, दारू दुकानांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील प्रमुख रस्ते (एम.डी.आर.) राष्ट्रीय महामार्ग घोषित केले असून त्याची अधिसूचना राज्यातील संबंधित खात्यांना पाठविली आहे. या अधिसूचनेला आमदार मायकल लोबो यांनी तीव्र हरकत घेतली आहे.
लोबो यांनी कळंगुट येथे बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात निवडणूक आचारसंहिता काळात ही अधिसूचना केंद्रीय मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठविली, त्यामुळे मुख्यमंत्री व इतरांपर्यंत ती पोहचली नाही. हे रस्ते महामार्ग घोषित करणे, राज्यासाठी आत्मघातकी ठरेल. राज्यात येणाऱ्या नव्या सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्र सरकाराला या रस्त्यांचे महामार्गात रूपांतर करण्यापासून रोखावे.
लोबा पुढे म्हणाले की, नेरूल, वेरे, कांदोळी, कळंगुट, हडफडे हे ग्रामीण रस्ते आहेत. या रस्त्यांचे महामार्ग झाल्यास बाजूला असलेल्या घरांवर, व्यावसायिक आस्थापनांवर मोठे संकट येणार आहे. तसेच हा परिसर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मद्य विक्री बंदी क्षेत्रात येणार आहे. गोवा राज्यासाठी हा निर्णय घातक असून राज्यात येणाऱ्या नव्या सरकारने हा प्रश्न गांभीर्याने हाताळावा.
(प्रतिनिधी)