गोव्यात कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास ९० टक्के हॉटेल आरक्षण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:41 PM2021-03-23T23:41:10+5:302021-03-23T23:41:20+5:30
मंत्री मायकल लोबो यांनी तर कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास गोव्याच्या पर्यटनाला लगेच मोठा फटका बसेल असे सांगत हॉटेलमधील ९० टक्के खोली आरक्षण रद्द होईल, अशी भीती व्यक्त केली.
पणजी : परप्रांतांमधून जे कुणी गोव्यात येतात, त्यांच्यासाठी कोविडचे प्रमाणपत्र सक्तीचे केले जावे अशा प्रकारचा विचार आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे व्यक्त करत असले तरी, प्रत्यक्षात सरकारला ही सूचना मान्य नाही. मंत्री मायकल लोबो यांनी तर कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास गोव्याच्या पर्यटनाला लगेच मोठा फटका बसेल असे सांगत हॉटेलमधील ९० टक्के खोली आरक्षण रद्द होईल, अशी भीती व्यक्त केली.
मध्यंतरी कोविड संकट व लॉकडाऊनचा गोव्याला मोठा फटका बसला. पर्यटन व्यवसायिकांची सगळी गणिते कोलमडली. आता नव्याने स्थिती रुळावर येत असतानाच कोविड रुग्ण संख्या राज्यात नव्याने वाढत आहे. शिवाय शेजारील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये व अन्य काही राज्यांतही कोविड रुग्णसंख्या खूप वाढली. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांनी अधिक काळजी घ्यावी अशी सूचना मंत्री राणे यांनी नुकतीच केली. गोव्यात जे पर्यटक येतात, त्यांच्यासाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा पर्याय सरकारने विचारात घ्यावा असे राणे यांनी सूचविले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची सध्या गरज नाही असे मत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, कळंगुटच्या किनारी भागाचे आमदार असलेले मंत्री लोबो हे हॉटेल व्यवसायिकही आहेत. त्यांनी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीची झाल्यास पर्यटनावर नव्याने परिणाम होईल असे सांगितले. गोवा हे सुरक्षित राज्य मानून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. कोविड निगेटीव प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास लगेच पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवू लागतील असे लोबो म्हणाले. गोव्यातील टेक्सी, शेक व अन्य व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत ही गोष्ट अन्य मंत्रीही मान्य करतात.