२४ तासांत राज्यात ९.२६ इंच पाऊस, आतापर्यंत ५८ इंच पावसाची नोंद, सर्वाधिक वाळपईत ७१ इंच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:28 PM2024-07-08T15:28:00+5:302024-07-08T15:32:11+5:30
राज्य हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असून आजही राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
नारायण गावस
पणजी: रविवार पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या २४ तासांत तब्बल ९.२६ इंच पावसाची नोंद झाली त्याचप्रमाणे राज्यात आतापर्यंत एकूण ५८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्य हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असून आजही राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक जास्त पाऊस हा राजधानी पणजी केंद्रांत नोंद झाला आहे. राजधानीत गेल्या २४ तासांत १४ इंच पावसाची नोंद झाली तर ओल्ड गाेवा केंद्रावर १३ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्याच्या खालोखाल म्हापसा केंद्रावर ११.६ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राज्यात बहुतांश केंद्रावर गेल्या २४ तासांत माेठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस वाळपई केंद्रात नोंद झाल आहे. वाळपई एकूण ७१ इंच पाऊस झालेला आहे. तर सांगे केंद्रात ६८.४ इंच तर साखळीत ६५.५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी आलेल्या पुराने अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. ठिकठिकाणी झाडे पडली रस्ते खचले लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे अग्निशमन दलाला दिवसभर घटनांचे कॉल येत होते. दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन अनेक लोकांना लोकांना सहकार्य केले. आजही राज्यात बहुतांश ठिकाणी जाेराचा पाऊस सुरच आहे. अनेक भागात पुरस्थित असल्याने लोकांना मोठा त्रास झालेला आहे.
हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी रेड अर्लट दिल्याने आज राज्यात १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांना पुराच्या पावसाचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. तसेच अनेक रस्त्यावर आजही पावसाने पाणी साचले आहे. तसेच नदीला पुर आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.