पणत्या पेटवत असताना उडालेल्या भडक्यात भाजलेल्या ३२ वर्षीय तरूणीचे निधन
By काशिराम म्हांबरे | Published: November 23, 2023 05:05 PM2023-11-23T17:05:12+5:302023-11-23T17:05:34+5:30
नऊ दिवस देत होती मृत्यूशी झुंज
म्हापसा: काशिराम म्हांबरे: बार्देश तालुक्यातील रामतळे-हळदोणा येथे साईबाबांची पालखी नगरप्रदक्षिणा वेळी पालखीच्या स्वागतासाठी पणत्या पेटवत असताना उडालेल्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या दीक्षिता नाईक (३२) या महिलेचे अखेर दुर्दैवी निधन झाले. नऊ दिवस तिने मृत्यूशी दिलेली झुंज शेवटी अपयशी ठरली.
१३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली. घटनेच्या दिवशी पालखी निमीत्त घराजवळ पणत्या पेटवत होती. पालखी घराजवळ पोहोचल्याचे पाहून तिने घाईगडबडीत पणत्यामध्ये तेलाऐवजी चुकून पेट्रोल ओतले. तिच्या पतीने ही पेट्रोलने भरलेली बाटली घरी आणून ठेवली होती. ते दीक्षिताच्या लक्षात आले नाही. तिने खाद्यतेल तेल समजून पणत्यांमध्ये पेट्रोल ओतत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला. यात तिच्या हातात असलेली पेट्रोलची बॉटल अंगावर उसळली. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेली. हा सर्व प्रकार घडताच आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते. यात ती ७० टक्के भाजून गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात व तेथून नंतर पुढील उपचारासाठी बांबोळी येथे गोमेकॉमध्ये दाखल करण्यात होते. मात्र सुरु असलेल्या उपचाराला प्रतिसाद न लाभल्याने त्यातच तिचे निधन झाले.