डोमिनोजच्या दुकानाबाहेरील जनरेटरला भयंकर आग; अग्निशमनची गाडी आली
By पंकज शेट्ये | Published: October 30, 2023 05:19 PM2023-10-30T17:19:29+5:302023-10-30T17:19:59+5:30
सोमवारी सकाळी ११.३० वाजता ती घटना घडली.
वास्को: सोमवारी (दि.३०) वास्को शहरात येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘डोमिनोज पिझ्झा’ दुकाना बाहेरील जनरेटरला भयंकर आग लागण्याची घटना घडली. आग लागल्यानंतर नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण आणले, मात्र तोपर्यंत जनरेटर जळून खाक झाला. सुदैवाने आगीच्या घटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
सोमवारी सकाळी ११.३० वाजता ती घटना घडली. वास्को शहरात येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘डोमिनोज पिझ्झा’ दुकानाबाहेरील जनरेटरला अचानक आग लागली. जनरेटरला आग लागल्याचे तेथे असलेल्या लोकांना दिसताच त्यांनी ती आग विझवण्यासाठी विविध प्रयत्न केले. मात्र काही क्षणातच जनरेटरला लागलेल्या आगीने भयंकर रुप धारण केले. आग लागलेल्या जनरेटरच्या जवळच काही दुचाक्या पार्क करून ठेवल्या होत्या. मात्र आग लागल्याचे दिसताच काही नागरिकांनी दुचाक्या तेथून हटवून त्यांना होणारी नुकसानी रोखली. वास्को आणि नौदलाच्या अग्निशामक दलाला आगीच्या घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलल्यानंतर काही मिनिटाने त्यांना यश प्राप्त झाले.
त्या घटनेची अधिक माहीती घेण्यासाठी वास्को अग्निशामक दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांना संपर्क केला असता ‘शोर्ट सरकीट’ मुळे ती आग लागली असावी असा अंदाज त्यांने व्यक्त केला. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास काही मिनिटासाठी वीज पुरवठा खंडीत झाला असता ‘डोमिनोझ पिझ्झा’ दुकानाबाहेर असलेला तो जनरेटर चालू झाला होता. त्याचवेळी ‘शोर्ट सरकीट’ होऊन ती आग लागली असावी असा संशय बिचोलकर यांनी व्यक्त केला. आगीच्या त्या घटनेत सुमारे आठ लाखाचे नुकसान झाले असावे असा अंदाज असल्याचे बिचोलकर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी जनरेटरला लागलेल्या त्या भयंकर आगीच्या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.