मोरजीत चालत्या कदंब बसखाली झोकून देऊन मजुराची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 04:21 PM2024-01-07T16:21:56+5:302024-01-07T16:22:13+5:30
मोरजीतील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर कदंब बसखाली झोकून देऊन एका मजुराने आत्महत्या केली.
पेडणे : मोरजीतील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर कदंब बसखाली झोकून देऊन एका मजुराने आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा थरारक प्रकार घडला. सुरुवातीला अपघात झाल्याचे वाटत असताना प्रत्यक्षदर्शींनी मजुराने बसखाली उडी मारल्याचे सांगितले. (बिन तिरकी २८. मूळ रा. झारखंड) असे त्याचे नाव आहे. त्यानंतर पंचायतीने परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामध्ये या आत्महत्येचा उलगडा झाला.
घटनास्थळी व पोलिसांनी सांगितले की, कदंब महामंडळाची प्रवासी बस (जीए ०एक्स ०५१४) ही मांद्रे-मोरजीमार्गे पणजी जात होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी चालकाने बस थांबवली. त्याचवेळी मजुराने बसखाली उडी घेतली. सुरुवातीला लोकांना वाटले की, मजूर बसच्या चाकाखाली सापडला आणि अपघात झाला. परंतु मोरजी पंचायतीने बसवलेल्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीमुळे हा अपघात नसून मजूर थेट बसखाली उडी घेत असल्याचे दिसले. मजूर बसखाली उडी मारण्याचा प्रयत्न करीत असताना येथील खड्डेमय रस्त्यावर आपटला. माती वाहून गेल्यामुळे टोकदार दगड झाले आहेत. या मजुराचे डोके दगडावर जोराने आपटून रक्तस्राव झाला असावा असे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, कदंब बसच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथे धाव घेतली. दरम्यान घटनेवेळी उपस्थितांनी बस उभी असताना किंवा चालक बस थांबवत असताना या मजुराने उडी घेतल्याचे सांगितले. तासाभरानंतर मोरजी पंचायतीने बसवलेल्या तेथील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केले. सीसीटीव्हीत कदंब बस एका बाजूने जात असताना मजूर खूप अंतरावर असल्याचे दिसले. नंतर त्याने उडी मारल्याचेही सीसीटीव्हीत दिसले.
दरम्यान, मजुराने आत्महत्या का केली? याो कारण अद्याप समजलेले नाही. पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर तपास करत आहेत. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीत गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला.