वकिलावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा; दारुच्या नशेत कार चालवत असल्याचं उघड
By काशिराम म्हांबरे | Published: October 31, 2023 06:09 PM2023-10-31T18:09:15+5:302023-10-31T18:09:19+5:30
या अपघातनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी देसाई यांना पकडून जिल्हा इस्पितळात दारू सेवनाच्या चाचणीसाठी नेले होते
म्हापसा: गिरी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हीट अँड रन अपघात प्रकरणातील संशयित आरोपी वकील मिलिंद नाईक देसाई हे दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे म्हापसा पोलिसांनी त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांत सदोष मनुष्य वध आणि पुरावे नष्ट करणे सारकी कलमेजोडली आहेत.
हा अपघात १५ ऑक्टोबरला घडलेला.या अपघातनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी देसाई यांना पकडून जिल्हा इस्पितळात दारू सेवनाच्या चाचणीसाठी नेले होते. या चाचणीत ते दारू प्यायले होते, असे स्पष्ट झालेआहे. इस्पितळाच्या पॅथॉलोजी विभागाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी संशयित वकील मिलिंद नाईक देसाई यांच्या विरोधातील गुन्ह्यात भादंसंच्या ३०४ व २०१ कलमाअंतर्गत खून, पुरावे नष्ट करणे ही कलमे जोडली आहेत. यापूर्वी पोलिसांनी भा.दं.सं.च्या २७९, ३०४ अ व मोटारवाहन कायदा कलम १८५, १३४ अ आणि १३४ ब अंतर्गत गुन्हा नोंद केला होता, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
गिरी-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर हीट अँड रन अपघातात म्हापशातील एका काल्ड्रिंक्सचे मालक प्रदीप नार्वेकर (६२) यांचा मृत्यू झाला होता. नार्वेकर हे १५ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने दुचाकीने येत होते. गिरीतील टिकलो पेट्रोल पंपाजवळ एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालकाने जखमी नार्वेकर यांना त्याच अवस्थेत सोडून पळ काढला होता.