खांडोळा फोंडा येथील श्री महागणपती मंदिरातील चोरी प्रकरणी एकास अटक, दिली गुन्ह्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:09 PM2022-11-07T21:09:00+5:302022-11-07T21:09:21+5:30
चोरी करण्यात येणारे मंदिर हेरून झाल्यानंतर संशयित त्या मंदिरापासून लांब अंतरावर वास्तव्य करून राहायचा. मंदिरापर्यंत तो चांगल्या महागड्या टॅक्सीत यायचा व दरोडा घालून झाल्यानंतर त्याच टॅक्सीला पुन्हा फोन करून बोलावून घ्यायचा.
अजय बुवा -
गोव्यातील खांडोळा फोंडा येथील श्री महागणपती मंदिरातील चोरी प्रकरणी संतोष कुमार (राहणार ओडिसा ,वय 42) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे .
सविस्तर वृत्तानुसार 17 ऑगस्ट रोजी गणपती मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून संशयिताने गणपतीच्या मूर्तीच्या अंगावरील दागिने व फंड भेटीतील रोख रक्कम चोरून नेली होती.सुमारे बारा लाखाचा मुद्देमाल त्याने पळवला होता. या संदर्भात पोलिसांनी योग्य तो तपास करून अडीच महिन्यानंतर चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ह्या प्रकरणी उपअधीक्षक सी.एल.पाटील यांनी केलेला तपास हा महत्त्वाचा ठरलेला आहे.
देशभरातल्या पोलिसांना चकवले, गोवा पोलिसांनी व्यवस्थित अडकवले -
मंदिर दरोडा प्रकरणी उपअधीक्षक सी एल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरट्याने ह्या अगोदर 2009 च्या दरम्यान म्हापसा येथील मंदिरात चोरी केली होती. त्यावेळी म्हपसा येथील ब्रागांझा हॉटेलमध्ये तो राहिला होता. त्याच्या त्या मोडस ओपरंडीचा फायदा पोलिसांनी यावेळी करून घेतला व त्याच्या मुसक्या आवळल्या.
श्रीमंतीचा बनाव करायचा -
चोरी करण्यात येणारे मंदिर हेरून झाल्यानंतर संशयित त्या मंदिरापासून लांब अंतरावर वास्तव्य करून राहायचा. मंदिरापर्यंत तो चांगल्या महागड्या टॅक्सीत यायचा व दरोडा घालून झाल्यानंतर त्याच टॅक्सीला पुन्हा फोन करून बोलावून घ्यायचा. ह्या दरम्यान तो स्वतः चांगला श्रीमंत असल्याचे भासवायचा. त्याच्या अंगावरील पेहरावावरून लोकांना तो श्रीमंतच आहे, असे वाटायचे. चोरी करण्याच्या दिवशी रात्रीच्या आरती झाल्यानंतर लोक माघारी फिरल्याबरोबर तो देवळात घुसायचा. व भल्या पहाटेपर्यंत आपले कार्य उरकून घ्यायचा. हिच कार्यपद्धती त्याने खांडोळा मंदिर फोडताना वापरली आणि तिथेच तो फसला.
17 ऑगस्टच्या मध्यरात्री मंदिराच्या दाराची कडी कापून सवयीप्रमाणे तो आत शिरला व त्याने अगोदर तिथले डीव्हीआर नष्ट केले. नंतर एक फंड पेटी फोडून पैसे लंपास केले. मूर्तीच्या अंगावरील दागिने पिशवीत भरले. दुसरी फंड पेटी फोडण्याअगोदर त्याला चाहूल लागली व त्याने गर्भकुडी जवळ असलेल्या दारातून बाहेर पळ काढला. ज्या टॅक्सीने तो रात्री आला होता त्याला त्याने परत बोलावून घेतले व पणजीला रवाना झाला. सदर टॅक्सी चालकाची जबानी पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे.
पहाटे पुजारी मंदिरात आल्यानंतर त्याच्या लक्षात चोरीचा प्रकार आला व संपूर्ण फोंडाभर एकच खळबळ माजली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला परंतु डीव्हीआर नष्ट झालेले असल्याने तपासाची वेगळी दिशा ठरविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. 17 ऑगस्ट च्या रात्री खांडोळा मंदिर फोडण्याबरोबरच उजगाव येथील दोन एटीएम पळविण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही दरोडे एकाच टोळीने घातल्याचा संशय निर्माण झाला होता. परंतु सी एल पाटील यांना मात्र पहिल्या दिवसापासून म्हापश्याचा मंदिर चोरीचा सारीपाट आठवत होता. तोच मार्ग धरून त्यानी तपास सुरू केला.
दरम्यान पर्वरी येथील चोरीच्या प्रकरणात एका संशयिताला पकडण्यात आल्याची माहिती मिळताच पाटील यांनी त्या चोरट्याचा फोटो पाहिला. पाटील यांना तो चेहरा व म्हापसा मंदिर प्रकरणातील बारा वर्षांपूर्वीचा चोराचा फोटो जुळवला असता काहीसे साम्य आढळून आले. ईथेच खांडोळा चोरीच्या तपासाला दिशा मिळाली.
खांडोळा मंदिर दरोडा घातल्यानंतर चोरट्याने अगोदर कोल्हापूर गाठले होते व काही दिवसानंतर तो पुन्हा पणजीत दाखल झाला होता. पोलिसांच्या सुदैवाने तेथील एका चोरी प्रकरणात तो पकडला गेला.
चोरीचा मालही जप्त होईल -
संशयिताने चोरीची कबुली दिलेली आहे. ज्या टॅक्सीने तो मंदिरापर्यंत आला त्या टॅक्सी चालकाने सुद्धा ह्याला दुजोरा दिला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली अवजारे जप्त करण्यात आली आहेत. सध्या चोरून नेण्यात आलेले दागिने हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदरचे दागिने त्याने आतापर्यंत विकूणही टाकले असतील. परंतु पाटील म्हणतात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे मागच्या अडीच महिन्यात तो किती लोकांच्या संपर्कात होता ह्यावरून चोरीचा माल लगेचच हस्तगत करण्यात येईल. त्याचबरोबर चोरीचा माल विकत घेणाऱ्यांचीही गय करण्यात येणार नाही.
दरम्यान संशयिताला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिली आहे.