कॅसिनो कनेक्ट असलेल्या एकाने ‘त्यांच्या’ सोयीसाठी विकत घेतले १५० कोटींचे हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:48 AM2022-12-08T08:48:27+5:302022-12-08T08:48:36+5:30
विशेष ‘स्टाफ’ आणि ‘अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची सोय’ : अडचणीचे ठरू नये म्हणून खबरदारी
नरेश डोंगरे / आशिष रॉय
पणजी (गोवा) : विशेष ‘स्टाफ’ आणि वारंवार येणारे ‘अतिमहत्त्वाचे पाहुणे’ यांच्यासाठी वारंवार महागडे हॉटेल करणे अडचणीचे ठरते म्हणून कॅसिनो लॉबित कनेक्ट असलेल्या एकाने गोव्यात चक्क दीडशे कोटींचे हॉटेलच खरेदी केले. संबंधित वर्तुळात या हॉटेल खरेदीमागची पार्श्वभूमी आणि त्याच्याशी संबंधित किस्से रंगवून सांगितले जातात.
गोव्यात कॅसिनोचा धंदा नोटा छापण्याच्या कारखान्यासारखा ठरला आहे. त्याचमुळे एकाचे दोन आणि दोनाचे चार कॅसिनो सुरू करून आपला कॅसिनो ग्रुप (समूह) काहींनी तयार केला आहे. यातून रोज नोटांची पोती भरली जाते. कॅसिनोत येणाऱ्यांना वेगवेगळी सेवा देण्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी काही विशेष स्टाफचीही नियुक्ती आहे. या विशेष स्टाफच्या राहण्या- खाण्याची आणि अन्य सेवांचीही विशेष खबरदारी कॅसिनो संचालकाकडून घेतली जाते. त्यांचे तसे विशेष मूल्यही त्यांना दिले जाते, असे सांगण्यात आले.
‘ते’ पाहुणे कोण?
याच्याशीच दुसरी एक बाब संलग्न आहे. ती म्हणजे, कॅसिनोवर काही ठिकाणचे अतिमहत्त्वाचे पाहुणे नियमित येतात. त्यांनाही विशेष सेवा दिली जाते. अशा पाहुण्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यांना सेवाही थ्री स्टार, फाइव्ह स्टारच हवी असते.
त्यामुळे अशांना वारंवार महागड्या हॉटेलमध्ये ठेवणे अडचणीचे ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे की काय एका कॅसिनो संचालकाने ‘विशेष स्टाफ, विशेष अतिथी आणि विशेष सेवा’ यासाठी गोव्यात चक्क दीडशे कोटींचे एक हॉटेलच खरेदी केल्याचे सांगितले जाते. या हॉटेलच्या खरेदीचे अनेक किस्से चर्चेला असले तरी याबाबत अधिकृत माहिती मात्र कुणाकडून मिळत नाही.
गोवा, पणजीत अनेक सदनिका
कॅसिनोत सेवा देणाऱ्या स्टाफला आणि कनेक्टिंग पिपल्सला हॉटेल, लॉजमध्ये ठेवणे परवडण्यासारखे नाही. ही मंडळी नेहमी नजरेस पडू शकते त्यामुळे पुढे समस्या निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेत या मंडळीसाठी गोवा, पणजीतील अनेक सदनिका भाड्याने घेण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या भागात ही मंडळी भाड्याच्या सदनिकेत राहायला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आणखी काही हॉटेल, सदनिका विकत घेण्याची तयारी सुरू असल्याचेही असल्याचेही बोलले जाते.