न्याहारीसाठी ब्रेडचे पॅकेट फोडले असता सापडली उंदराची विष्ठा, गोव्यात घडला प्रकार
By सूरज.नाईकपवार | Published: October 21, 2023 05:59 PM2023-10-21T17:59:20+5:302023-10-21T18:01:17+5:30
गोव्यातील दक्षिण गोवा येथील लोटली येथे ही घटना घडली.
मडगाव - न्याहारासाठी ब्रेडचे पॅकेट फोडले असता, आतमध्ये उंदराच्या लेंडया सापडण्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोव्यातील दक्षिण गोवा येथील लोटली येथे ही घटना घडली.एफडीएने या एकंदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खात्याचे दक्षिण गोव्याचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी त्वरीत कारवाई करताना संबधित कारखान्याला नोटीस बजावून उंदीर व इतर कीटकांवर नियत्रंण आणण्यासाठी तात्काळ पेस्ट कंट्रोल प्रक्रिया करण्याचा आदेश दिला आहे. ही प्रक्रिया होईपर्यंत या ब्रेडचे उत्पादन बंद करण्याचाही आदेश दिला आहे.
साकवाळ येथील आरिश बेकरीकडून तयार केल्या जाणाऱ्या जेसिया सॅन्डवीच ब्रेड या पॅक केलेल्या उत्पादनात लोटली येथील एका ग्राहकाला उंदराच्या लेंडया सापडल्या. शुक्रवारी सकाळी हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. शाळेत जाणाऱ्या पाल्यांसाठी ब्रेकफास्ट बनविण्यासाठी एका महिलेने हे ब्रेड आणले होते. ते उघडले असता त्या ब्रेडच्या तीन स्लाईसमध्ये उंदराच्या लेंडया सापल्या. नंतर या महिलेने गोवा कॅनशी संपर्क साधला. नंतर गोवा कॅनने या संबधी एफडीएच्या दक्षिण गोवा कार्यालयात तक्रार केली. मागाहून एफडीएने या बेकरीत जाउन तेथे तपासणी केली. एफडीएचे अधिकारी नोरोन्हा यांच्याशी संपर्क साधला असता, या बेकरीच्या विरोधात एफडीए कायद्याच्या ३२ कलमाखाली नोटीस बजाविली असून, चौकशी चालू असल्याचे सांगितले.