गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका

By किशोर कुबल | Published: July 9, 2024 02:48 PM2024-07-09T14:48:41+5:302024-07-09T14:48:52+5:30

न्हयबाग, पोरस्कडे आणखी एक दरड कोसळली

A series of landslides on the National Highway in Goa | गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका

गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका

किशोर कुबल/पणजी

पणजी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर न्हयबाग, पोरस्कडे येथे आज पहाटे आणखी एक दरड कोसळली. यामुळे जुन्या मार्गाने वाहतूक वळवावी लागली.

गेल्या आठ दिवसात या भागात दरडी कोसळण्याची मालिका सुरू असून मालपेंपासून काही अंतरावर आज पहाटे ही येथे दरड कोसळली. हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच व्यस्त असतो.  मुंबई-गोवा बसगाड्या पहाटेच गोव्यात पोहचत असतात. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. परंतु बगल रस्त्याच्या बाबतीत कंत्राटदाराने डोंगर फोडून केलेले निकृष्ट बांधकाम, यामुळे संताप पसरला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुवारी ११ रोजी गोव्यात येत आहेत. तसेच येत्या १५ जुलैपासून गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने जोरदार टीका चालवली आहे.

कारवाई करा : काँग्रेसची मागणी
 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,' एम. व्ही. राव इन्फ्रा कंपनी या कंत्राटदाराला ताबडतोब अटक करून काळ्या यादी टाका. हा कंत्राटदार भाजपचा जावई बनला आहे. बगल रस्त्याच्या कामाच्या बाबतीत शरमजनक घोटाळा झालेला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी.'
दरम्यान, दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने राज्यात ठीकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. कोने,प्रियोळ येथे दोन दिवसापूर्वी मोठी दरड कोसळली.

'भूस्खलनासाठी असुरक्षित'
दरम्यान, राज्य भूस्खलनासाठी असुरक्षित होत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. भूस्खलनाच्या अलीकडील संशोधनाने अशा नैसर्गिक आपत्तींबाबत, विशेषत: पावसाळ्यात राज्याची वाढती असुरक्षितता अधोरेखित केली आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या सर्वसमावेशक अभ्यासात भूस्खलन-प्रवण क्षेत्रांचे बारा नवीन नकाशे तयार केले आहेत, ज्यांची पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातही नोंद झाली नव्हती

Web Title: A series of landslides on the National Highway in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा