पालकाची नजर चुकवून दुसऱ्या रेल्वेत चढला; कोकण रेल्वेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला
By सूरज.नाईकपवार | Updated: April 5, 2024 21:40 IST2024-04-05T21:40:16+5:302024-04-05T21:40:21+5:30
गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आज शुक्रवारी ही घटना घडली.मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपुर येथील हे कुटुबिय असून ते गोव्यात सहलीसाठी आले होते.

पालकाची नजर चुकवून दुसऱ्या रेल्वेत चढला; कोकण रेल्वेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला
मडगाव: पालकाची नजर चुकून दुसऱ्या रेल्वेमध्ये चढलेला एक सहा वर्षीय मुलगा कोकण रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे सापडला. आपला मुलगा सापडल्याची माहिती सबंधीत पालकांना मिळाल्यानंतर त्यांचाही जीव भांडयात पडला. पोलिस त्यांना देवाच्या रुपानेच मदतीला धावून आले.
गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आज शुक्रवारी ही घटना घडली.मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपुर येथील हे कुटुबिय असून ते गोव्यात सहलीसाठी आले होते. परतीच्या प्रवासाला जाताना वरील घटना घडली. मडगाव ते नागपुर रेल्वेतून ते जाणार होते. मडगाव रेल्वे स्थानकावर ते रेल्वेची प्रतिक्षा करीत होते. त्याच वेळी प्लॅटफॉमवर अन्य एक रेल्वेने थांबा घेतला होता. तो मुलगा आपल्या पालकाची नजर चुकवून त्या रेल्वेत चढला. रेल्वेने पुढील प्रवास केल्यानतंर त्या मुलाच्या पालकाची एकच धावपळ उडाली. नंतर त्यांनी लागलीच याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पोलिसांनी तपास करुन यासंबधी करमळी पोलिस ठाण्यात माहिती दिली. करमळी येथे ती रेल्वे पोहचताच पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढले. व्हिडीओ कॉलवर त्या मुलासोबतची माहिती त्याच्या पालकांना दिली. तोच मुलगा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला मडगावात आणून पालकाच्या स्वाधीन केले.