गोमेकाॅवरुन विरेश बोरकर व आरोग्य मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी
By पूजा प्रभूगावकर | Published: February 10, 2024 12:14 PM2024-02-10T12:14:41+5:302024-02-10T12:14:51+5:30
विरेश हे अपरिपक्कव व नवे आमदार आहेत. राजकारणी म्हणून तेगंभीर नाहीत.
पणजी: गोमेकॉत लोकांची गैरसोय होत असल्याने आपण आवाज उठवत आहेत. यात कुठलेही राजकारण नाही. मात्र जर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना तसे वाटत असल्यास जनता काय ते उत्तर देईल अशी टीका सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी केली.
विरेश हे अपरिपक्कव व नवे आमदार आहेत. राजकारणी म्हणून तेगंभीर नाहीत. त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार असला तरी ते जे प्रश्न विचारतात त्याची त्यांना फारशी माहिती नसते अशी टीका मंत्री राणे यांनी केली होती. त्यावर बोरकर यांनी हे उत्तर दिले. त्यामुळे गोमेकाॅवरुन या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
बोरकर म्हणाले, की गोमेकॉतील कॅज्युएलटीचे सिलिंग पडून अनेक महिने उलटले तरी त्याची दुरुस्ती झालेली नाही. गोमेकॉत रुग्णांची गैरसोय होत असून औषधे महाग दराने मिळत आहेत. त्यासाठी विझिटींग समिती नेमावी अशी मागणी आपण विधानसभेत आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. मात्र मंत्री ही समिती नेमणार नसल्याचे सांगत आपल्यावरच टीका करीत आहेत.