२०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा विश्वास
By किशोर कुबल | Published: April 18, 2023 02:12 PM2023-04-18T14:12:56+5:302023-04-18T15:01:49+5:30
केंद्रीय मंत्री मांडविया हे जी -ट्वेंटी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीनिमित्त गोव्यात आहेत.
पणजी : जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधी म्हणजेच २०२५ पर्यंत भारत देश क्षयरोगमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी येथे केला.
केंद्रीय मंत्री मांडविया हे जी -ट्वेंटी आरोग्य कार्यगटाच्या बैठकीनिमित्त गोव्यात आहेत. त्यांनी जी -ट्वेंटी प्रतिनिधींसोबत येथील जनऔषधी केंद्राला (जेनेरिक मेडिसिन आउटलेट) भेट दिली. याप्रसंगी बोलताना मांडविया म्हणाले की, '२०३० च्या जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधीच भारत देश क्षयरोगमुक्त जकरण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे.
जेनेरिक औषधे दर्जेदार व किफायदशीर आहेत. जी ट्वेंटी प्रतिनिधींना 'जेनेरिक मेडिसिन मॉडेल'च्या क्षमतेचे स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले की, हे मॉडेल अंगिकारु इच्छिणाऱ्या कोणत्याही देशाला मदत करण्यास भारत तयार आहे.दरम्यान, मंत्री मांडविया यांच्यासोबत प्रतिनिधींनी खोर्ली येथील एबी हेल्थ अँड वेलनेस सेंटरलाही भेट दिली.
भारताच्या पहिल्या मोबाइल बीएसएल-३ लॅबचे प्रात्यक्षिक
दरम्यान, भारताने 'रामबान (रॅपिड अॅक्शन मोबाइल बीएसएल-३ अॅडव्हान्स्ड ऑगमेंटेड) नावाची पहिली मोबाइल बायोसेफ्टी लेव्हल-३ (बीएसएल-३) प्रयोगशाळा सुरू करून वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ही मोबाइल प्रयोगशाळा जी ट्वेंटी बैठकीत प्रदर्शित करण्यात आली. ही प्रयोगशाळा नव्याने उदयास येत असलेल्या व्हायरल इन्फेक्शन्सची तपासणी करण्यासाठी डिझाइन केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडतील, अशी अपेक्षा आहे.
कोविड महामारीचा सामना करण्यासाठीही ती महत्वाची भूमिका बजावते. चाचणी प्रक्रिया आता सोपी झाली आहे आणि चाचण्या आणि निकाल तयार करण्यात येणारा वेळ कमी केला आहे. ग्रुप ऑफ ट्वेंटीच्या या बैठकीत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन मधील राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. उद्या बुधवारी बैठकीचा शेवटचा दिवस आहे.